शेतकऱ्याच्या मुलीने आशियाई ‘सायकलिंग’ स्पर्धेत जिंकले सुवर्ण

बेला - मयूरी लुटेचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम. एम. मेश्राम व इतर.
बेला - मयूरी लुटेचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम. एम. मेश्राम व इतर.

नागपूर - मनात जिद्द आणि डोळ्यासमोर निश्‍चित ध्येय असेल तर, कोणतीही परिस्थिती तुमच्या मार्गात आडकाठी बनू शकत नाही. भंडारा जिल्ह्यातील बेला गावच्या शेतकऱ्याची मुलगी मयूरी लुटे हिने ते सिद्ध करून दाखविले. मयूरीने दिल्ली येथे नुकत्याच संपलेल्या आशियाई ‘सायकलिंग’ स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावून देशासह दहा हजार लोकवस्ती असलेल्या बेल्याचेही नाव रोशन केले.

१८ वर्षीय मयूरीने २०० मीटर आणि ५०० मीटरमध्ये अव्वल स्थान मिळवून भारताला दुहेरी सुवर्ण जिंकून दिले. दोन वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या आंतरराष्ट्रीय ‘सायकलिंग’ स्पर्धेतही तिने सोनेरी यश मिळविले होते. एशियाडमध्ये तिरंगा फडकावून नुकतीच घरी परतलेल्या या सुवर्णकन्येने स्पर्धेतील अनुभव व भविष्यातील योजना ‘सकाळ’शी शेअर केल्या.

‘सायकलिंग’मधील आतापर्यंतच्या प्रवासावर मी समाधानी आहे. परंतु, मला अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे स्वप्न असून, स्वप्नपूर्तीसाठी मी कसून मेहनत घेत आहे. मयूरी सध्या दिल्ली येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) मध्ये प्रशिक्षक राजेंद्रकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरा गांधी स्टेडियममध्ये ‘सायकलिंग’चे धडे घेत आहे. 

‘रनिंग’कडून ‘सायकलिंग’कडे
मयूरी मुळात धावपटू होती. पाच वर्षांपूर्वी पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीत धावण्याच्या शर्यतीत प्रथम आल्यानंतर सायकल प्रशिक्षक दीपाली पाटील यांची नजर तिच्यावर पडली. तिथून मयूरीचा ‘सायकलप्रवास सुरू झाला. तिने पुण्यात दीपाली यांच्याकडे जवळपास दोन वर्षे ‘सायकलिंग’चे प्रशिक्षण घेतले. अल्पवधीतच तिने आपले टॅलेंट दाखविले. 

२०१४ मध्ये कर्नाटक येथे  झालेल्या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत ब्राँझपदक पटकाविले. २०१६ मध्ये केरळ येथे झालेल्या स्पर्धेत मयूरीने चक्‍क राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तिने आतापर्यंत विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आठ सुवर्ण, चार रौप्य आणि चार ब्राँझपदकांची कमाई केली आहे. मयूरीचे वडील धनराज व आई सुनीता हे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे केवळ दोन एकर शेती असून, त्यातील धानपिकावर लुटे परिवाराचा उदरनिर्वाह चालतो. मयूरीला तीन बहिणी आहेत.

मयूरीवर कौतुकाचा वर्षाव
भंडारा जिल्ह्याला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल मयूरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोंढी येथील ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालयातर्फे तिचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य एम. एम. मेश्राम, पर्यवेक्षक एस. एस. शेंद्रे, मुख्याध्यापक पी. एस. नागदेवे, एस. व्ही. हातझाडे यांच्यासह प्रा. शीलवंतकुमार मडामे, एच. एस. बैस व मयूरीचे आईवडील उपस्थित होते. माजी खासदार नाना पटोले व खासदार मधुकरराव कुकडे यांनीही पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com