लोढा समिती बेकार; वेळेचा निव्वळ अपव्यय

सागर शिंगटे
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

"बीसीसीआयमधील प्रशासकीय समितीचे कामकाज बेकार होते. क्रिकेटमध्ये सुधारणा करण्याचा लोढा समितीचा उद्देश चांगला होता. मात्र, समितीने निव्वळ वेळेचा अपव्यय केला", अशी खरमरीत टीका माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनिअर यांनी केली. 

पिंपरी : "बीसीसीआयमधील प्रशासकीय समितीचे कामकाज बेकार होते. क्रिकेटमध्ये सुधारणा करण्याचा लोढा समितीचा उद्देश चांगला होता. मात्र, समितीने निव्वळ वेळेचा अपव्यय केला", अशी खरमरीत टीका माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनिअर यांनी केली. 

थेरगाव येथील पीसीएमसीज व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमीला माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनिअर, कर्सन घावरी यांनी भेट दिली. त्यावेळी, इंजिनिअर यांनी वरील टीका केली. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यावेळी उपस्थित होते. 

इंजिनिअर म्हणाले, " प्रशासकीय समिती आता पडद्याआड गेली असून माजी कर्णधार सौरव गांगुली याच्याकडे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे आली आहेत. क्रिकेटपटूच बीसीसीआयचे कामकाज करणार आहे. ही बाब स्वागतार्ह आहे. गांगुली त्याच्या कर्णधाराला साजेसेच  बीसीसीआयचे कामकाज करेल."

कर्सन घावरी म्हणाले, "सध्याच्या भारतीय संघात सर्वोत्तम जलदगती गोलंदाज आहेत. एकाच वेळेस संघात ४ ते ५ जलद गती गोलंदाज यापूर्वी नव्हते. परंतु, आता हे शक्य झाले आहे. त्यामुळे, गोलंदाजीेत भरपूर पर्याय उपलब्ध झाले आहेत. भारतीय संघ वेगळ्याच उंचीवर गेला आहे. "

वेंगसरकर म्हणाले, "देशात प्रथमच दिवस-रात्र कसोटी मालिका भरविण्याचा विचार चालू आहे. परंतु, दिवस-रात्र कसोटीचा अनुभव घ्यावा लागेल. मगच,  त्यावर बोलता येईल. "


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farokh engineer slams COA