महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

उस्मानाबाद - महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी येथे सुरू असलेल्या २७ व्या फेडरेशन करंडक खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. पुरुषांचा संघ कोल्हापूरशी, तर महिलांचा संघ कर्नाटकाशी विजेतेपदाची लढत खेळेल. 

उस्मानाबाद - महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी येथे सुरू असलेल्या २७ व्या फेडरेशन करंडक खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. पुरुषांचा संघ कोल्हापूरशी, तर महिलांचा संघ कर्नाटकाशी विजेतेपदाची लढत खेळेल. 

महाराष्ट्राच्या संघांनी मिळविलेले एकतर्फी विजय पुन्हा एकदा त्यांच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले. महिलांनी प्रियांका बोपी, श्रुती सकपाळ, आरती कांबळे, ऐश्‍वर्या सावंत यांच्या खेळाच्या जोरावर दिल्लीचा १०-६ असा एक डाव ४ गुणांनी पराभव केला. पुरुष संघाला कर्नाटकाने झुंजवले असले, तरी सामन्यावरील महाराष्ट्राची पकड कधीच ढिली पडली नव्हती. महाराष्ट्राने कर्णधार महेश शिंदेच्या, अक्षय गणपुले यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर कर्नाटकाचा ९-६ असा तीन गुणांनी पराभव केला. दुसऱ्या डावात महाराष्ट्राचे आक्रमण फिके पडले. त्यांना एकही गुण कमावता आला नाही. पण, बचावपटूंनी ती कमतरता सहजपणे भरून काढली. 

महिलांच्या विभागातील कर्नाटक वि. केरळ हा सामना अपेक्षेप्रमाणे रंगला. नियोजित वेळेतील ८-८ अशा बरोबरीनंतर अलाहिदा डावात कर्नाटकाने केरळचे आव्हान १२-११ असे मोडून काढले. कर्नाटकाच्या वीणाचा दोन्ही डावांबरोबरच अलाहिदा डावातील बचाव लक्षवेधक ठरला. तिला मेघाने अष्टपैलू खेळाची साथ दिली. 

पुरुष विभागातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात विजय हजारे आणि सागर पोतदार यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर कोल्हापूरने तेलंगणाचा १०-९ असा एक डाव ९ गुणांनी पराभव केला.

Web Title: Federation Trophy kho-kho