भारतास बाद केलेले घाना उपांत्यपूर्व फेरीत दाखल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

हरल्याचे दुःख आहे, पण स्पर्धेतील कामगिरीवर निराश नाही. आम्ही पहिल्यांदाच स्पर्धेत खेळत होतो. बाद फेरीत प्रवेश केला. या लढतीत बचावातील चुका टाळल्या असत्या, तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. 
- तैमोको इस्माईला, नायजर मार्गदर्शक

नवी मुंबई : ब्लॅक स्टारलेटस्‌ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या घानाने नवी दिल्लीत भारतास चार गोलने पराजित करीत गटविजेतेपद जिंकले होते. त्याच घानाने नवी मुंबईत आपल्याच खंडातील नायजरचा पाडाव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता त्यांची लढत आफ्रिका खंडातीलच मालीविरुद्ध होईल. 

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर या संध्याकाळच्या लढतीस गर्दी केलेल्या सुमारे एकवीस हजार चाहत्यांमध्ये घानाचे पाठीराखेही लक्षणीय होते. त्यांच्या घाना... घाना या घोषणांपासून प्रेरणा घेत घाना सुरवातीपासून वन-वे ट्रॅफिक सुरू केला. सुरुवातीस त्यांना काही प्रमाणात स्पर्धा पदार्पण करणाऱ्या नायजरच्या प्रतिआक्रमणास सामोरे जावे लागले, पण सदोष आक्रमणामुळे त्यांना 2-0 असा निसटता विजयच लाभला. 

चेंडूवर 67 टक्के-33टक्के असे एकतर्फी वर्चस्व, गोल करण्याच्या तब्बल 23 संधी तरीही आघाडीसाठी पूर्वार्धातील भरपाई वेळेपर्यंत प्रतीक्षा करण्याची वेळ घानावर आली. त्यांचे केवळ सात प्रयत्न ऑन टार्गेट होते, त्यावरून त्यांची नेमबाजी किती सदोष होती हे दिसून येते. आम्हाला ही बाब सतावत आहे. त्यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे पण पुरेसे यश मिळत नाही ही बाब सलत आहे, पण हा संघ 17 वर्षांखालील आहे, याकडे घानाचे मार्गदर्शक फॅबिन सॅम्यूएल यांनी लक्ष वेधले. 

घानाचे दोन गोल एरिक अय्याह आणि बदली खेळाडू रिचर्ड डॅनोस यांनी केले, पण नायजर गोलरक्षक लावाली खालेद याने त्यांचे गोलचे सहा प्रयत्न हाणून पाडले. दवडलेल्या गोलच्या संधीपैकी अय्याह याने उत्तरार्धात दवडलेली पेनल्टी किक आणि गोल पूर्ण रिकामा समोर दिसत असताना गिडेन मेन्साह याने गोलपोस्टवरून मारलेला चेंडू घानास सलत होता. 

हरल्याचे दुःख आहे, पण स्पर्धेतील कामगिरीवर निराश नाही. आम्ही पहिल्यांदाच स्पर्धेत खेळत होतो. बाद फेरीत प्रवेश केला. या लढतीत बचावातील चुका टाळल्या असत्या, तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. 
- तैमोको इस्माईला, नायजर मार्गदर्शक

Web Title: FIFA U-17 World Cup: Ghana sprint past Niger