कतारमधून कडक संदेश! तीन महिला रेफ्रींनी इतिहास रचला; FIFA World Cup | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIFA World Cup

FIFA World Cup: कतारमधून कडक संदेश! तीन महिला रेफ्रींनी इतिहास रचला

यंदाची ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धा विविध कारणांसाठी चर्चेत राहिली आहे. कतारमध्ये महिलांना फारसे स्वातंत्र्य नाही आणि यावरही बरीच टीका झाली आहे. मात्र, आता याच कतारमध्ये टीकेला फाटा देण्यात आला आहे. विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच महिला रेफरी मैदानावर पळताना दिसणार आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या सहायक रेफरीही महिलाच आहेत. (FIFA World Cup 2022 history is made as an all female refereeing trio taking charge for the first time at a men )

कुठल्याही स्पर्धेचे सामने सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी ही रेफरींची असते. 2022 मध्ये कतार येथे होणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी ‘फिफा’ने रेफरी, सहाय्यक रेफरी आणि व्हिडिओ सामनाधिकारी यांची घोषणा नुकतीच केली. यावेळी पहिल्यांदाच महिला रेफरींचीही नियुक्ती केली आहे.

यात स्टेफनी फ्रापार्ट (फ्रान्स), सलीमा मुकानसांगा (रवांडा) आणि योशिमी यामाशिता (जपान) यांचा समावेश आहे. या तिघींशिवाय नुजा बेक (ब्राझील), कॅरेन डायझ मेडिना (मेक्सिको) आणि कॅथरीन नेस्बिट (अमेरिका) यांन सहाय्यक पंच म्हणून निवडण्यात आले आहे.

44 वा सामना इतिहासाचा साक्षीदार असेल

कतारमध्ये खेळल्या जाणाऱ्या 64 पैकी 44 व्या सामन्यांसाठी ऐतिहासिक नियुक्ती केली आहे. फ्रापार्ट यांनी यापूर्वी चौथ्या अधिकाराची भूमिका निभावली होती. फ्रान्सच्या 38 वर्षीय फ्रानपार्टला युरोपियन फुटबॉल संघटना UEFA ने पुरुषांच्या सामन्यांमध्ये अधिकृत भूमिका घेण्यासाठी पदोन्नती दिली आहे.

कोण आहेत या महिला रेफरी?

स्टेफनी फ्रापार्ट

फ्रान्सची स्टेफनी फ्रापार्ट ही ऋण- चॅम्पियन्स लीग सामन्यात रेफरीची भूमिका बजावणारी पहिली महिला होती. याशिवाय तिने वर्ल्ड कप पात्रता आणि फ्रेंच फुटबॉल टूर्नामेंट लीग-1 मध्येही सहभाग घेतला आहे. नुकत्याच झालेल्या फ्रेंच टूर्नामेंट लीगच्या अंतिम फेरीत रेफरी म्हणून मैदानात उतरत इतिहास घडवला. गतवर्षी युरो कप स्पर्धेदरम्यानही ती मैदानात दिसली होती, मात्र तिची भूमिका चौथ्या रेफरीपर्यंत मर्यादित होती. फ्रानपार्टने 2019 मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट महिला रेफरीचा पुरस्कार जिंकला आहे.

सलीमा मुकानसांगा

रवांडाची सलीमा मुकानसांगा या वर्षी आफ्रिका कप सामन्यात रेफरी म्हणून काम पाहणारी भूमिका बजावणारी पहिली महिला ठरली. सलीमा 2012 पासून फिफासाठी रेफरी म्हणून काम करत आहेत. ती एक व्यावसायिक बास्केटबॉल खेळाडू होती.

योशिमी यामाशिता

जपानी रेफरी यामाशिता योमिशी फ्रान्समध्ये 2019 महिला वर्ल्ड कपमध्ये काम केल्यानंतर सलग दुसर्‍या वर्ल्ड कपमध्ये भाग घेण्यासाठी सज्ज झाली आहे. पुरुषांच्या वर्ल्ड कप स्पर्धेत महिला प्रथमच रेफरी म्हणून काम करताना अभिमान वाटतो. महिलांची क्षमता नेहमीच वाढत आहे हे यावरून सिद्ध होतंय. योशिमीने यंदाच्या एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये इतिहास घडवला. या स्पर्धेत रेफरी बनणारी ती पहिली महिला ठरली.

फुटबॉलमध्ये महिला पंचांच्या सहभागाला कधीपासून सुरुवात झाली?

महिला पंचांचा सहभाग कधीपासून झाला, याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. ऑस्ट्रियाच्या एडिथ क्लिजंर या 1935 ते 1938 या काळात पुरुष आणि माहिला फुटबॉलमध्ये पंच म्हणून कार्यरत होत्या, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु ‘फिफा’ने तुर्कस्तानच्या द्राहसन एर्डा (1968-1997) यांना जगातील पहिल्या महिला फुटबॉल पंच असल्याचे 2018 मध्ये घोषित केले. एर्डा यांनी तुर्कस्तान आणि जर्मनीमध्ये जवळपास 30 वर्षे पंचाची भूमिका बजावली.

टॅग्स :2022 FIFA World Cup