पदकाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी तंदुरुस्ती महत्त्वाची - श्रीकांत

वृत्तसंस्था
सोमवार, 18 जून 2018

आशियाई स्पर्धा माझे मुख्य लक्ष्य आहे. ही संधी हुकली, तर मला पुन्हा चार वर्षे थांबावे लागेल. त्यामुळे मी या वेळी मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड ओपन स्पर्धेत खेळेन, सिंगापूर स्पर्धेत खेळणार नाही. त्यानंतर जागतिक स्पर्धा आणि मग आशियाई स्पर्धा असे माझे नियोजन असेल. - किदांबी श्रीकांत 
 
नवी दिल्ली - गेल्या बॅडमिंटन मोसमातील सुपर सीरिजमधील चार विजेतीपदे टिकविण्यापेक्षा भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत याला आशियाई पदकाचे आव्हान अधिक वाटते. त्यामुळेच आपण अधिक भर तंदुरुस्ती टिकविण्यावर दिल्याचे सांगितले.  श्रीकांत म्हणाला, ""विजेतीपदे टिकविण्यापेक्षा तंदुरुस्तीचे मोठे आव्हान माझ्यासमोर आहे. माझ्या दोन्ही पायाचे घोटे दुखावले आहेत. ऑलिंपिकनंतर उजव्या, तर गेल्यावर्षी डाव्या पायाचा घोटाही दुखावला. त्यामुळेच मी आता सरावासाठी कुठल्या स्पर्धेत सहभागी व्हायचे याचे नियोजन करत आहे. आशियाई स्पर्धेत पदक मिळविणे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे.'' 

गेल्या मोसमात माझी कामगिरी काय झाली, यापेक्षा या वेळी काय करायचे हे माझ्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगून श्रीकांत म्हणाला, ""गेल्या मोसमात काय केले याची काळजी मला नाही. या वर्षी चार-पाच स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. त्या स्पर्धेत खेळण्याच्या दृष्टीने माझे नियोजन सुरू आहे. त्यामुळे काही स्पर्धा मी खेळणार नाही.'' 

आशियाई स्पर्धा माझे मुख्य लक्ष्य आहे. ही संधी हुकली, तर मला पुन्हा चार वर्षे थांबावे लागेल. त्यामुळे मी या वेळी मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड ओपन स्पर्धेत खेळेन, सिंगापूर स्पर्धेत खेळणार नाही. त्यानंतर जागतिक स्पर्धा आणि मग आशियाई स्पर्धा असे माझे नियोजन असेल. - किदांबी श्रीकांत 
 
Web Title: Focus is on fitness to win medal at Asian Games says Kidambi Srikanth