भारताची आणखी एक सत्त्वपरीक्षा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली - फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय दर्जापासून खूप दूर असल्याचे दिसून आल्यावर पुन्हा एकदा भारतीय फुटबॉल संघ आपल्या गुणवत्तेची सत्त्वपरीक्षा देण्यासाठी सज्ज झाला आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेत उद्या त्यांची लढत दक्षिण अमेरिकेतील बलाढ्य कोलंबियाशी पडणार आहे. 

नवी दिल्ली - फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय दर्जापासून खूप दूर असल्याचे दिसून आल्यावर पुन्हा एकदा भारतीय फुटबॉल संघ आपल्या गुणवत्तेची सत्त्वपरीक्षा देण्यासाठी सज्ज झाला आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेत उद्या त्यांची लढत दक्षिण अमेरिकेतील बलाढ्य कोलंबियाशी पडणार आहे. 

पहिल्या सामन्यात भारताला अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागला. सहभागी संघ आणि भारतीय संघ यांच्यात दर्जाबाबत असलेली दूरी पहिल्या सामन्यात दिसून आली. त्यातही भारतीय खेळाडूंनी मनापासून खेळ करताना आपल्याच कौशल्य आणि गुणवत्तेची जणू सत्त्वपरीक्षाच पाहिली होती. अशीच आणखी एक सत्त्वपरीक्षा देण्यासाठी भारतीय उद्या पुन्हा मैदानात उतरणार आहेत. त्यांच्यासमोर आव्हान असेल ते कोलंबिया संघाचे. 

भारतीय संघाचा मध्यरक्षक सुरेश सिंग याने चेंडू खेळवत नेताना अंतिम पास देण्याच्या तयारीत भारतीय संघाने सुधारणा करण्याची गरज आहे. पण, कोलंबियाविरुद्ध खेळताना या एकाच आघाडीवर सुधारणा आवश्‍यक नसून, सार्वत्रिक खेळ उंचावणे महत्त्वाचे आहे. भारताप्रमाणेच पदार्पण करणाऱ्या नायजेर संघापासून यजमान संघाच्या खेळाडूंनी प्रेरणा घेणे अपेक्षित आहे.

नायजेरने पहिल्या सामन्यात उत्तर कोरियावर विजय मिळविला. एक आफ्रिकन देश करू शकतो, तर मग भारत का नाही? असे म्हणणे एकवेळ सोपे आहे. पण, ते मैदानात प्रत्यक्षात येणे खूप कठीण आहे. प्रशिक्षक माटोस म्हणाले, ‘‘अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण, त्यांच्या एकूण खेळावर आपण समाधानी नाही. कोलंबिया तर त्यांच्यापेक्षा कठीण संघ आहे. आपली क्षमता ओळखून किमान प्रतिकार करण्याचे उद्दिष्ट भारतीय खेळाडूंनी गाठावे इतकीच माफक अपेक्षा आहे. असे असले, तरी आम्ही उद्या विजयासाठीच प्रयत्नशील राहू.’’

अमेरिकेविरुद्ध एखाद-दुसऱ्या प्रसंगात भारतीय खेळाडूंनी चमक दाखवली. तरी देखील प्रशिक्षक माटोस यांना खेळाडूंनी त्या पलीकडे जाऊन आपले अस्तित्व दाखवावे, असे वाटते. कोमल थाटल आणि अनिकेत जाधव या दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला. त्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे. या दोघांच्या प्रयत्नांना अन्य सहकाऱ्यांकडून साथ मिळायला हवी, असे देखील माटोस यांना वाटते. अन्वर अली, जितेंद्र सिंग आणि गोलरक्षक एम. धीरज सिंग यांच्या प्रयत्नांमुळे भारताने अमेरिकेविरुद्ध मोठा पराभव टाळला होता. त्यामुळे उद्यादेखील बचावाच्या आघाडीवर भक्कम राहणे भारताला फायद्याचे ठरेल. 

दुसरीकडे पहिल्या सामन्यात घानाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने कोलंबिया स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी आतुर असेल यात शंका नाही. भारतासारखा दुबळा प्रतिस्पर्धी असल्यामुळे ते ही संधी कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाहीत. विजय मिळविण्याच्या उद्देशाबरोबर जास्तीत जास्त गोल करून गोल सरासरी वाढविण्याचे नियोजन त्यांनी राखले असल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. स्पर्धेसाठी सर्वात आधी भारतात येऊनही परिस्थितीशी जुळवून घेण्यात त्यांना पहिल्या सामन्यात अपयश आले असे मानले जात आहे. पण, या सामन्यात ते आधीच्या सामन्यात आलेले अपयश धुऊन टाकतील, अशी आशा त्यांना आहे.

Web Title: football competition