फ्रान्स, स्पेन सरावात निष्प्रभ एका गतविजेत्याने हार टाळली; तर दुसऱ्याचा निसटता विजय
सराव लढतीत हेही घडले
- सर्बियाचा बोलिव्हियाविरुद्ध (5-1) सफाई विजय
- विजेत्यांचे पूर्वार्धातच चार गोल; अलेक्झांडर मित्रोविक याची हॅट्ट्रिक
- सर्बियाचा प्रामुख्याने एरियल पासचा सराव
- डॅनियल एर्झानीच्या गोलमुळे ऑस्ट्रेलियाची हंगेरीविरुद्ध सरशी
- एर्झानी स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू, कांगारूंना स्वयंगोलचीही भेट
- मोरोक्कोने विजयी मालिका कायम राखताना एस्टोनियास (3-1) हरवले
- स्वीडन-पेरू लढत कंटाळवाणी; गोलच्या दिशेने अवघे चार शॉट्स
माद्रिद - विश्वकरंडक विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची आशा असलेल्या फ्रान्सला अमेरिकेविरुद्ध बरोबरीसाठी झगडावे लागले; तर विजेतेपदासाठी तज्ज्ञांची पसंती वाढत असलेल्या स्पेनला अखेरच्या मिनिटास केलेल्या गोलमुळे ट्युनिशियाविरुद्ध विजय लाभला.
वर्ल्डकपची तयारी करताना सर्बिया, डेन्मार्क, मोरोक्को, ऑस्ट्रेलियाने विजय मिळविला; तर स्वीडनला पेरूने गोलशून्य बरोबरीत रोखले. अर्थात, सर्वांचे लक्ष फ्रान्स आणि स्पेनच्या लढतीकडे होते. दिदिएर देशॅम्प यांनी विश्वकरंडकात खेळणाराच फ्रान्सचा संघ मैदानात उतरवला. घरच्या मैदानावरील लढतीत फ्रान्सला भेदक चालींसाठी झगडावे लागत होते. त्यातच अमेरिकेने पूर्वार्ध संपण्याच्या सुमारास आघाडी घेतली. उत्तरार्धात फ्रान्स आक्रमक झाले; पण गोल होतच नव्हता. अखेर बारा मिनिटे असताना फ्रान्सने बरोबरी साधली.
कोणताही सामना जिंकणेच चांगले; पण ही पूर्वतयारीची लढत आहे. आक्रमणात जोष नव्हता, हे खरे आहे. उत्तरार्धात सुरवातीच्या वीस मिनिटांत अपेक्षित खेळ झाला नाही. सरावात सर्वांना संधी दिली आहे. आता सर्वच पहिल्या लढतीसाठी सज्ज आहेत, असे दिदिएर देशॅम्प यांनी सांगितले; पण सरावातून प्रश्न सुटण्याऐवजी निर्माण झाले आहेत, असेच त्यांना वाटत होते.
आठ वर्षांपूर्वीच्या विजेत्या स्पेनलाही ट्युनिशियाविरुद्धचा सामना लवकरात लवकर विसरणे आवडेल. ट्युनिशियाच्या प्रतिआक्रमणांनी स्पेनची डोकेदुखी वाढवली. सहा मिनिटे असताना लागो ऍस्पास याचा गोल सोडल्यास स्पेनसाठी क्वचितच काही चांगले घडले. अर्थात सलग वीस सामन्यांत अपराजित राहिल्याचे समाधान त्यांना नक्कीच लाभले.