परदेशातील बॉक्‍सरच भारतात प्रशिक्षणास येतील

पीटीआय
सोमवार, 29 जुलै 2019

भारतातील बॉक्‍सरनीच परदेशात प्रशिक्षण तसेच सरावासाठी जाण्याची गरज नाही, परदेशातील बॉक्‍सरही भारतात येऊ शकतात. भारतीय बॉक्‍सिंग पदाधिकारी या दिशेने विचार करीत आहेत.

नवी दिल्ली, ता. 28 ः भारतातील बॉक्‍सरनीच परदेशात प्रशिक्षण तसेच सरावासाठी जाण्याची गरज नाही, परदेशातील बॉक्‍सरही भारतात येऊ शकतात. भारतीय बॉक्‍सिंग पदाधिकारी या दिशेने विचार करीत आहेत.

जागतिक तसेच ऑलिंपिकसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी भारतीय बॉक्‍सर परदेशात विशेषतः युरोप अमेरिकेत सराव करतात. या सततच्या प्रवासामुळे भारतीय थकतात. त्यामुळे परदेशातील बॉक्‍सरच भारताच्या सराव शिबिरात सहभागी व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यास डिसेंबरच्या मध्यास सुरुवात होऊ शकेल, असे भारतीय बॉक्‍सिंगचे हाय परफॉर्मन्स डायरेक्‍टर सॅंतिएगो निएवा यांनी सांगितले.

ऑलिंपिक पात्रता स्पर्धा जानेवारीत आहे. त्याचा सराव नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये होईल. त्यावेळी भारतातील हवामान चांगले असते, तर युरोपात जास्त थंडी असते. त्यामुळे भारतात सराव केल्याचा फायदा होईल. आम्ही काही देशांना निमंत्रित केले आहे. काही देशांकडून सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले.

बॉक्‍सरचा भरगच्च कार्यक्रम
- जुलै-ऑगस्टमध्ये कझाकस्तान, फिलिपिन्स व रशियातील स्पर्धा
- सप्टेंबरमध्ये रशियातील जागतिक स्पर्धा
- ऑक्‍टोबरमध्ये राष्ट्रीय स्पर्धा
- जानेवारीत टोकियोमध्ये पहिली ऑलिंपिक पात्रता स्पर्धा

इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस्‌ येथे सरावाच्या चांगल्या सुविधा आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर त्याबाबत करार केला आहे. पतियाळातील सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठीही आमचा प्रयत्न आहे.
- सॅंतिएगो निएवा, भारतीय बॉक्‍सिंगचे हाय परफॉर्मन्स डायरेक्‍टर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: foreign boxer will train in india