कठोर कारवाईअभावी ‘सॅंडपेपर गेट’ घडले - स्टीव वॉ

वृत्तसंस्था
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

पॅरिस -  ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील अंतर्गत पद्धतच अशी बनली आहे, की त्यामुळे खेळाडूंचा वस्तुस्थितीशी संबंधच उरलेला नाही. आपण खेळापेक्षा मोठे आहोत अशा भ्रमात खेळाडू वावरतात. चेंडू कुरतडण्याच्या प्रकारांविरुद्ध कठोर कारवाई नसल्यामुळे ‘सॅंडपेपर गेट’ घडण्यास मोकळीक मिळाली, असे परखड प्रतिपादन माजी कर्णधार स्टीव वॉ यांनी केले.

यंदा मार्चमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील न्यूलॅंड्‌स कसोटीत कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्या सांगण्यावरून नवोदित कॅमेरॉन व्हाइटने सॅंडपेपरने चेंडू घासण्याचा प्रयत्न केला. हे सिद्ध झाल्यामुळे या तिघांवर बंदी घालण्यात आली  आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अलीकडेच चेंडू कुरतडणे हा द्वितीयवरून तृतीय श्रेणीचा गुन्हा ठरविला. त्यानुसार सहा कसोटी किंवा १२ वन-डे सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते.

या पार्श्‍वभूमीवर स्टीव वॉ म्हणाले, की ‘खेळाडू मैदानावरील ओबडधोबड जागेवर चेंडू मुद्दाम टाकतात. वास्तविक त्यांनी तसे करता कामा नये; पण तसे घडते आणि त्यामुळे चेंडूची स्थिती खराब होते. या प्रकारांना आळा घातला जात नाही. हे प्रकार इतक्‍या टोकाला कसे गेले याची लाज वाटते; पण माझ्या मते पदाधिकाऱ्यांनी असे घडू दिले. पूर्वी काही कर्णधार चेंडू कुरतडण्यात पुढाकार घ्यायचे; पण कारवाई फार सौम्य होते किंवा होत नाही. त्यामुळे हे हाताबाहेर जाणे अटळ  होते.’

ऑस्ट्रेलियातील स्थितीबद्दल स्टीव वॉ यांनी सांगितले, की ‘खेळाडूंभोवती खोटे वलय निर्माण केले जाते. अनेक गोष्टींची झळ त्यांना बसू दिली जात नाही. त्यांच्या भोवती अनेक लोकांचे कोंडाळे असते. ही मंडळी खेळाडूंना वेगळ्या विश्‍वात घेऊन जातात. त्यामुळेच सॅंडपेपर गेट घडले. आपण जे काही कृत्य करतोय त्याबद्दल सामान्य माणसाची काय प्रतिक्रिया उमटू शकते, हेच खेळाडूंना कळले नाही. याचे कारण वस्तुस्थितीपासून ते दूर  होते.’

लोक हेच आव्हान
स्मिथ-वॉर्नर यांच्यावरील बंदी मार्च २०१९ मध्ये संपेल. त्यानंतर विश्‍वकरंडक स्पर्धा आणि ॲशेस दौऱ्यासाठी स्थान मिळविण्याची त्यांना संधी असेल. स्टीव वॉ यांच्या मते प्रेक्षक हेच या तिघांच्या मानसिक लढाईमधील मुख्य आव्हान असेल. स्मिथ अजून बराच तरुण आहे. त्याचे क्रिकेटवर प्रेम आहे. खेळातील स्थान पुन्हा कमावण्याची उत्कट इच्छा त्याच्याकडे आहे. लोकांनी या प्रकरणाविषयी बोलता कामा नये हेच त्याच्यासमोरील मुख्य आव्हान असेल. याचे कारण उरलेल्या आयुष्यात दररोज एक तरी माणूस भेटेल आणि तो विचारेल, की त्यादिवशी काय घडले? स्मिथची सरासरी ६०च्या घरात आहे, जी डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर सर्वोत्तम आहे. तो पुनरागमन करेल याची खात्री आहे.

स्मिथ आणि वॉर्नर लहान मुलांसाठी अजूनही रोलमॉडेल ठरू शकतात. हे त्यांच्याच हातात आहे. त्यांची खेळावर निष्ठा आहे. त्यांच्याकडे इच्छाशक्ती आहे. त्यांना पापमुक्त होण्याची नामी संधी आहे. ऑस्ट्रेलियन जनता त्यांना क्षमा करेल आणि पुढील दिशेने वाटचाल करेल.
- स्टीव वॉ,  माजी कर्णधार

Web Title: Former Australia captain Steve Waugh