माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रशांत वैद्यसह तिघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

अनेकांची भूमिका संशयास्पद
भूपती स्टील कंपनीला कोट्यवधींचे कर्ज मंजूर करण्यापूर्वी तारण ठेवण्यात येत असलेल्या जमिनीची शहानिशा होणे आवश्‍यक होते. कर्ज विभागाचे मुख्य व्यवस्थापक वामन हेडाऊ, बॅंकेचे व्यवस्थापक घोडपागे आणि जमिनीचा पाहणी अहवाल (सर्च रिपोर्ट) सादर करणारे बॅंकेचे वकील विजय पेटकर यांची भूमिका संशयास्पद आहे. हेडाऊ यांनी कर्ज मंजूर केल्यानंतर घोडपागे यांनी कंपनीला ओव्हर ड्राफ्ट खाते वापरण्याची परवानगी दिली. तर विजय पेटकर यांनी पाहणी न करताच कर्ज मंजूर करण्यासाठी क्‍लिअरन्स रिपोर्ट दिल्याचे बॅंक चौकशीत समोर आले आहे. पोलिस त्यादृष्टीने तपास करीत असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. 

नागपूर - भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू प्रशांत श्रीधर वैद्य, त्यांचे भाऊ प्रफुल्ल श्रीधर वैद्य आणि वहिनी वर्षा प्रफुल्ल वैद्य (सर्व रा. पुष्पकुंज कॉम्प्लेक्‍स, न्यू सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ) यांच्याविरुद्ध बॅंक ऑफ बडोदाची दोन कोटी ४० लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत वैद्य हे सध्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत.

प्रफुल्ल वैद्य हे भूपती स्टील या कंपनीचे संचालक आहेत. मौजा द्रुगधामना परिसरातील ७/१२ वरील १२ (अ) आणि ८ (अ) मधील खसरा क्रमांक ७२/१ या १.७५ हेक्‍टर जमिनीच्या मालकीचा वाद सुरू आहे. त्यासंदर्भात न्यायालयात खटला सुरू आहे. या जमिनीचे मूळ मालक संतोष बडवे हे असून आता ही जमीन त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर संतोष बडवे यांच्या नावाने आहे. प्रफुल्ल वैद्य हे स्टील कॅरिअर या दुसऱ्या कंपनीत भागीदार असताना २००१ मध्ये संतोष बडवेकडून खसरा क्रमांक ७२/१ वरील जमीन खरेदी केली असल्याचा त्यांचा दावा आहे. दरम्यान, व्यवसायासाठी प्रफुल्ल वैद्य व प्रशांत वैद्य यांनी भूपती स्टील कंपनीकरिता भांडवल उभारण्यासाठी बॅंक ऑफ बडोदाच्या राणी दुर्गावती चौकातील शाखेत कर्जासाठी अर्ज केला. त्याकरिता वरील जमीन स्टील कॅरिअर कंपनीच्या मालकीची असल्याचे सांगून तारण ठेवली. वर्षा वैद्य यांनी कर्जाची हमी घेतली होती. 

बॅंकेचे तत्कालीन व्यवस्थापक वामन हेडाऊ यांनी २ कोटी ४० लाख रुपये कर्ज मंजूर केले. त्यासाठी भूपती स्टील कंपनीच्या नावाने ओव्हर ड्राफ्ट बॅंक खाते उघडण्यात आले होते. त्या खात्यातून वेळोवेळी पैसे काढून १२ एप्रिल २०१६ ला ते खाते बंद करण्यात आले. खाते बंद झाल्यानंतर व कर्जाच्या रकमेची परतफेड न झाल्याने बॅंकेने पुन्हा जमिनीचे दस्तावेज तपासले. ही जमीन दुसऱ्याच्या नावाने असून त्याचा वाद न्यायालयात सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या फसवणुकीची तक्रार प्रथम आर्थिक गुन्हे शाखेकडे करण्यात आली. परंतु, आर्थिक गुन्हे शाखेने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे बॅंकेने न्यायालयात धाव घेतली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अनेकांची भूमिका संशयास्पद
भूपती स्टील कंपनीला कोट्यवधींचे कर्ज मंजूर करण्यापूर्वी तारण ठेवण्यात येत असलेल्या जमिनीची शहानिशा होणे आवश्‍यक होते. कर्ज विभागाचे मुख्य व्यवस्थापक वामन हेडाऊ, बॅंकेचे व्यवस्थापक घोडपागे आणि जमिनीचा पाहणी अहवाल (सर्च रिपोर्ट) सादर करणारे बॅंकेचे वकील विजय पेटकर यांची भूमिका संशयास्पद आहे. हेडाऊ यांनी कर्ज मंजूर केल्यानंतर घोडपागे यांनी कंपनीला ओव्हर ड्राफ्ट खाते वापरण्याची परवानगी दिली. तर विजय पेटकर यांनी पाहणी न करताच कर्ज मंजूर करण्यासाठी क्‍लिअरन्स रिपोर्ट दिल्याचे बॅंक चौकशीत समोर आले आहे. पोलिस त्यादृष्टीने तपास करीत असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. 

आर्थिक गुन्हे शाखेची चालढकल
या प्रकरणाची पहिली तक्रार बॅंकेने आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती. २०१६ पासून प्रकरण त्यांच्या तपासात होते. पण, आर्थिक गुन्हे शाखेकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर बॅंकेने वकील अनिल किनारखेडे यांच्यामार्फतीने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्या आदेशाच्या आधारावर बॅंकेचे व्यवस्थापक रोशन गोपीचंद बागडे (५५) रा. रामदेवबाबा कॉम्प्लेक्‍स, नवीन सुभेदार ले-आऊट यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former International cricketer Prashant Vaidya has filed a complaint