
WTC Final 2023 Ball Tampering : ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्ध केलं चीटिंग; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे गंभीर आरोप
WTC Final 2023 Ball Tampering : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा दुसरा डाव 296 धावात गुंडाळला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 469 धावांचा डोंगर उभारला. त्यांनी पहिल्या डावात 173 धावांची आघाडी घेतली. मात्र पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियावर पाकिस्तानचे माजी खेळाडू बसित अली यांनी गंभीर आरोप केले आहेत.
अली म्हणतात की ऑस्ट्रेलियाने चेंडूसोबत छेडछाड केली. त्यामुळेच भारताची पहिल्या डावात अशी अवस्था झाली आहे. कमिन्स आणि कंपनीने 15 व्या षटकाच्या जवळपास बॉलशी छेडछाड केली त्यामुळेच भारताची फलंदाजी ढेपाळली. 52 वर्षाच्या अलींनी याची सामना अधिकारी, समालोचक, भारतीय खेळाडू यांनीं देखील दखल न घेण्यावर आश्चर्य व्यक्त केले.
अली एका यूट्यूब चॅनलशी बोलताना म्हणाले की, 'प्रथम मी अंपायर आणि जे कॉमेंट्री बॉक्समधून सामना पाहत होते त्यांच्यासाठी टाळ्या वाजणार आहे. ऑस्ट्रेलियाने स्पष्टपणे चेंडूशी छेडछाड केली आहे. विशेष म्हणजे त्याबाबत कोणीही बोलत नाहीये? याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे फलंदाज चेंडू सोडत असताना बोल्ड होत आहेत.'
अली पुढे म्हणाले की, 'मी तुम्हाला पुरावा देतो. जोपर्यंत मोहम्मद शमी 54 व्या षटकापर्यंत गोलंदाजी करत होता तोपर्यंत चेंडूची शाईन बाहेरच्या बाजूला होती. चेंडू स्टीव्ह स्मिथच्या दिशेने स्विंग होत होता. याला रिव्हर्स स्विंग म्हणत नाहीत. रिव्हर्स स्विंगमध्ये ज्यावेळी चेंडूची शाईन ही आतल्या बाजूला असते आणि चेंडू आत येतो.'
बसित अली पुढे म्हणाले की, 'विराट कोहली ज्या चेंडूवर बाद झाला त्या चेंडूची शाईन पहा. स्टार्कने शाईन असलेली बाजू बाहेरच्या बाजूला धरली होती. मात्र चेंडू विरूद्ध दिशेला गेला. रविंद्र जडेजा ऑन साईडला चेंडू मारत होता मात्र चेंडू पॉईंटच्या दिशेने जात होता. पंच आंधळे झाले आहेत का? देवलाच माहिती की इतके लोक तिथे बसले आहेत त्यांना ही गोष्ट कशी लक्षात आली नाही.'
'बीसीसीआय हे एवढे मोठे बोर्ड आहे. त्यांनाही हे दिसून आले नाही? याच अर्थ तुम्ही क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलेलेच नाही. ते फक्त भारत फायनलला आला आहे यातच खूष आहेत. ड्यूक बॉल 15 ते 20 षटकात रिव्हर्स स्विंग होतो का? कूकाबुरा चेंडूबाबत मी एक वेळ म्हणेन की रिव्हर्स होतोय. मात्र ड्यूक बॉल जवळपास 40 षटके तरी रिव्हर्स स्विंग होणार नाही.'