कॅसटकिनाने वॉझ्नियाकीला केले "आउट' 

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जून 2018

अपुरा होत जाणारा प्रकाशही जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या कॅरोलिन वॉझ्नियाकीला वाचवू शकला नाही. रशियाच्या दारिया कॅसाटकिना हिने तिच्यावर 7-6(7-5), 6-3 असा विजय मिळवून फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. 
 

पॅरिस - अपुरा होत जाणारा प्रकाशही जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या कॅरोलिन वॉझ्नियाकीला वाचवू शकला नाही. रशियाच्या दारिया कॅसाटकिना हिने तिच्यावर 7-6(7-5), 6-3 असा विजय मिळवून फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. 

स्पर्धेसाठी 14वे मानांकन मिळालेल्या कॅसटकिना हिने रविवारी अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबला, तेव्हा वॉझ्नियाकिविरुद्ध 7-6, 3-3 अशी आघाडी घेतली होती. सोमवारी लढत पुन्हा सुरू झाल्यावर वॉझ्नियाकीकडून प्रतिकार अपेक्षित होता. मात्र, 21वर्षीय कॅसटकिनाचा झंझावात रोखण्यात तिला अपयश आले. कॅसटकिना प्रथमच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडकली आहे. तिची गाठ आता अमेरिकन विजेत्या स्लोआनी स्टिफन्स हिच्याशी पडेल. 

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या सिमोना हालेप हिनेही आगेकूच कायम राखताना बेल्जियमच्या एलिसे मेर्टेन्स हिचा 6-2, 6-1 असा सहज पराभव केला. यापूर्वी येथे दोनदा उपविजेती राहिलेल्या हालेपने संथ सुरवात केली; पण लय गवसल्यावर तिने 16व्या मानांकित मेर्टेन्स हिच्यावर एकतर्फी विजय मिळविला. तिची गाठ आता एंजेलिक केर्बर आणि कॅरोलिन गार्सिया यांच्यातील विजेतीशी पडणार आहे. 

पुरुष विभागात अर्जेंटिनाच्या दिएगो श्‍वार्टझमन याने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचे "पॅक अप' केले. पाच सेटपर्यंत रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत त्याने अँडरसनचे आव्हान 1-6, 2-6, 7-5, 7-6(7-0), 6-0 असे परतवून लावले. पहिले दोन सेट सहज जिंकल्यानंतरही अँडरसनला आपल्या खेळात सातत्य राखता आले नाही. अँडरसनने 19 बिनतोड सर्व्हिस करूनही श्‍वार्टझमनचा संयम यशस्वी ठरला. 
 

Web Title: french open tenis