शापोवालोवचे मार्टेररकडून "पॅकअप' 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 जून 2018

नव्या पिढीतील प्रतिभासंपन्न खेळाडूंमध्ये, तसेच संभाव्य विजेत्यांमध्ये गणना झालेल्या कॅनडाच्या डेनिस शापोवालोव याला फ्रेंच ओपनच्या दुसऱ्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. जर्मनीच्या मॅक्‍सीमिलीयन मार्टेरर याने 5-7, 7-6 (7-4), 7-5, 6-4 असा सनसनाटी विजय मिळविला. 
 

पॅरिस - नव्या पिढीतील प्रतिभासंपन्न खेळाडूंमध्ये, तसेच संभाव्य विजेत्यांमध्ये गणना झालेल्या कॅनडाच्या डेनिस शापोवालोव याला फ्रेंच ओपनच्या दुसऱ्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. जर्मनीच्या मॅक्‍सीमिलीयन मार्टेरर याने 5-7, 7-6 (7-4), 7-5, 6-4 असा सनसनाटी विजय मिळविला. 

शापोवालोव 19 वर्षांचा असून त्याला 24वे मानांकन होते. कारकिर्दीत प्रथमच त्याला ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत मानांकन मिळाले होते. 22 वर्षांचा मार्टेरर 70व्या स्थानावर आहे. टायब्रेकमध्ये गेलेला दुसरा सेट जिंकून बरोबरी साधल्यानंतर त्याने शापोवालोवला संधी दिली नाही. 

थीम, चिलीचची आगेकूच 
प्रमुख स्पर्धकांपैकी ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीम आणि मरिन चिलीच यांनी आगेकूच केली. थीमने ग्रीसच्या स्टीफानोस त्सित्सिपासवर 6-2, 2-6, 6-4, 6-4 अशी मात केली. थीमला सातवे मानांकन आहे. बार्सिलोनातील स्पर्धेत 19 वर्षांच्या स्टीफानोसने त्याला हरविले होते. चिलीचने पोलंडच्या ह्युबर्ट हुर्काझची घोडदौड 6-2, 6-2, 6-7 (3-7), 7-5 अशी रोखली. ह्युबर्ट 188व्या क्रमांकावर असून, त्याने पात्रता फेरीतून आगेकूच केली होती. चिलीचने 48 "विनर्स' मारले; पण त्याच जोडीला त्याच्याकडून 52 वेळा सोपे फटके चुकले. 

मुगुरुझाची सरशी 
महिला एकेरीत माजी विजेत्या स्पेनच्या गार्बीन मुगुरुझाने फिओना फेरोवर 6-4, 6-3 अशी मात केली. फ्रान्सची फिओना 257व्या क्रमांकावर आहे. ती 21 वर्षांची आहे. मुगुरुझाचे फोरहॅंडचे फटके व्यवस्थित बसले नाहीत. 26 "विनर्स'च्या जोडीला तिचे फटके 23 वेळा चुकले; पण सलग पाचव्या वर्षी तिने तिसरी फेरी गाठली. 

Web Title: french tenis news