
ISSF World Cup : गनिमत सेखो, दर्शना राठोडचा अचूक वेध
अल्माटी : भारतीयांनी अझरबैझानमधील बाकू येथे पार पडलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये चार पदकांसह दुसरे स्थान पटकावल्यानंतर आता कझाकस्तानमधील अल्माटी येथे सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटनेच्या जागतिक स्पर्धेमध्ये दोन पदकांवर मोहोर उमटवली. गनिमत सेखो हिने रौप्यपदकाची कमाई केली, तर दर्शना राठोड हिने ब्राँझपदकाला गवसणी घातली.
महिलांच्या स्कीट प्रकारातील पात्रता फेरीत भारताच्या दोन खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. यामध्ये गनिमत व दर्शना या दोघींचा समावेश होता. कझाकस्तानची असीम ओरिनबाय हिने १२१ गुणांसह पहिले स्थान पटकावले. दर्शना १२० गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिली. दर्शनाने याप्रसंगी राष्ट्रीय विक्रमही नोंदवला. गनिमत ११७ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिली.
अंतिम फेरीमध्ये नेमबाजांमध्ये कमालीची चुरस दिसून आली. ३० शॉटनंतर गनिमत २५ गुणांसह आघाडीवर होती. ओरीनबाय २४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिली. दर्शना व बार्बोरा प्रत्येकी २२ गुणांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर होत्या. मात्र ३९व्या शॉटनंतर दर्शना सुवर्णपदक पटकावण्याच्या शर्यतीमधून बाहेर आली. तिला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.
पहिलेच पदक
गनिमत व ओरिनबाय यांच्यामध्ये सुवर्णपदकासाठी लढत झाली. यामध्ये गनिमत मागे राहिली. ओरिनबायने सुवर्णपदकावर नाव कोरले. गनिमतने रौप्यपदक पटकावले. जागतिक स्पर्धेमधील हे तिचे दुसरे पदक ठरले हे विशेष. दर्शना पहिल्यांदाच वरिष्ठ स्तरावर सहभागी झाली होती. यामुळे तिने पटकावलेले ब्राँझपदक लक्षणीय ठरले हे विशेष. या प्रकारात भारताच्या आणखी एका खेळाडूंचा समावेश होता. महेश्वरी चौहान हे तिचे नाव; पण १०८ गुणांसह तिला २४व्या स्थानावरच समाधान मानावे लागले.
पुरुषांकडून निराशा
पुरुषांच्या स्कीट प्रकारात भारताच्या तिन्ही खेळाडूंकडून निराशा झाली. मायराज खान ११९ गुणांसह १६व्या स्थानावर राहिला. गुरज्योत खंगुरा १८व्या स्थानावर राहिला. अनंतजीत सिंह नारुका यालाही ११८ गुणांचीच कमाई करता आली.