‘कुस्ती क्षेत्रातील हिरा हरपला’

‘कुस्ती क्षेत्रातील हिरा हरपला’

गणपतराव आंदळकर या नावाभोवती नेहमी वलय राहिले. ते एक नामांकित मल्ल होते. त्यांच्यासारखा शिस्तबद्ध मल्ल मी पाहिला नाही. त्यांना कुस्ती खेळताना मी पाहिले नाही. पण त्यांची शरीरयष्टी बॉडी बिल्डरसारखी होती.  
- श्रीमंत शाहू छत्रपती महाराज 

कुस्ती क्षेत्रातील जागतिक पातळीवरील एक तारा आज निखळला आहे. कुस्तीतील पावित्र्य राखत त्यांनी अनेक शिष्य घडवले. कुस्ती क्षेत्रात त्यांनी अव्याहतपणे काम केले. आज महाराष्ट्र एका मोठ्या अनुभवी मल्लास मुकला. 
- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

भारतातील एक अतिशय चांगल्या मल्लाला आज आपण मुकलो आहोत. त्यांचे व माझे न्यू मोतीबाग तालमीमुळे ऋणानुबंध होते. बदलत्या काळात मातीतील कुस्ती टिकविण्यासाठी ते शेवटच्या श्‍वासापर्यंत कार्यरत होते. 
- मालोजीराजे छत्रपती

छत्रपती घराणे व वस्ताद आंदळकर यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांचा साधेपणा आम्ही अनुभवला. आजही त्यांच्या तालमीत घडावे, यासाठी ग्रामीण भागातून मल्ल न्यू मोतीबागमध्ये येतात. ते आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या स्मृती आपल्यात कायम राहतील. 
- संभाजीराजे छत्रपती, खासदार

आमच्यात गुरू-शिष्याचे नाते होते. त्यांच्या पायावर डोके ठेवताना मोठा आनंद मिळत असे. त्यांच्यासारखा महान मल्ल पुन्हा होणार नाही. शासनाने त्यांना मरणोत्तर तरी ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करायला हवे. तीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.  
- हिंदकेसरी दीनानाथसिंह 

कुस्तीतला कोहिनूर हिरा आज निखळला. आमचे ते गुरू होते. प्रकृती अस्वस्थ असतानाही त्यांनी मातीशी इमान सोडले नाही. महिनाभर ते तालमीतच राहिले होते. तेथील मल्लांनी त्यांची सेवा केली. त्यांनी कुस्ती क्षेत्राला कधीही डाग लागू दिला नाही.  
- विष्णू जोशीलकर, महाराष्ट्र केसरी 

वस्तादांनी माझ्या आयुष्याला आकार दिला. त्यांच्या शिस्तीत आम्ही कुस्तीचे धडे गिरवले. त्यांनी आम्हाला पोटच्या मुलांप्रमाणे वाढवले. आमच्या चुका दाखवत कुस्तीतील डावपेचांना आकार दिला. 
- चंद्रहार पाटील, डबल महाराष्ट्र केसरी

ते कुस्ती क्षेत्रातील असाधारण व्यक्तिमत्त्व होते. मल्ल कसा असावा, याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. शेवटच्या क्षणापर्यंत ते तालमीशी नाळ जोडून होते. कोल्हापुरातील मल्लाने ऑलिंपिकला पदक मिळवणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. 
- राम सारंग, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते 

ते मनाने मोठे होते. त्यांचे निष्कलंक चारित्र्य व धवल कीर्ती हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्यात माणुसकी ओतप्रोत भरली होती. त्यांनी महान मल्ल घडविले. त्यांच्यात व मारुती माने यांच्यात बंधुत्व होते. दोघांनी देशाचा तिरंगा फडकवला.  
- शंकर पुजारी, कुस्ती निवेदक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com