नाशिकच्या गौरव लांबेला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

मुंबई - नाशिकच्या गौरव लांबे याने राष्ट्रीय किशोर तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्हच्या ऑलिंपिक फेरीच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. याचबरोबर या स्पर्धेत कंपाउंडच्या सांघिक स्पर्धेत राज्याच्या मुलींनी सुवर्णपदक जिंकले; तसेच मुलांच्या संघाने रिकर्व्ह प्रकारात सांघिक ब्राँझपदक जिंकले.

मुंबई - नाशिकच्या गौरव लांबे याने राष्ट्रीय किशोर तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्हच्या ऑलिंपिक फेरीच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. याचबरोबर या स्पर्धेत कंपाउंडच्या सांघिक स्पर्धेत राज्याच्या मुलींनी सुवर्णपदक जिंकले; तसेच मुलांच्या संघाने रिकर्व्ह प्रकारात सांघिक ब्राँझपदक जिंकले.

भुवनेश्‍वरला सुरू असलेल्या या स्पर्धेत प्राथमिक क्रमवारीत गौरव दुसरा होता; पण त्याने बाद पद्धतीने झालेल्या ऑलिंपिक प्रकाराच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताना अंतिम फेरीत सेनादलाच्या स्पर्धकास हरवले. सुरवातीस पिछाडीवर पडलेल्या गौरवने ०-२, १-३ पिछाडी भरून काढताना ३-३ बरोबरी साधली. चौथा आणि पाचवा सेटही बरोबरीत सुटल्याने प्रतिस्पर्ध्यांचे प्रत्येकी ५ गुण झाले. गौरवने टायशूटवर १०-९ अशी बाजी मारत सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे गौरव १५ मार्च रोजी त्याचा बारावीचा अखेरचा पेपर देऊन या स्पर्धेसाठी दाखल झाला होता. 

शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या गौरवने बारावीची परीक्षा असतानाही राष्ट्रीय स्पर्धा लक्षात घेऊन सराव थांबवला नव्हता. परीक्षेच्या दिवशी सराव केला नाही; पण आदल्या दिवशी एक तास तरी सराव केलाच होता. घरच्यांचा पाठिंबा असल्यामुळेच हा सराव करू शकलो, असे गौरवने सांगितले. 

दरम्यान, या स्पर्धेत महाराष्ट्राने दोन सुवर्ण आणि एक ब्राँझ जिंकल्याचे मार्गदर्शक प्रवीण सावंत यांनी सांगितले. मेघा अगरवाल, दिशा ओसवाल, इशा पवार, रियाने १९४५ गुणांची कमाई करीत सांघिक सुवर्णपदक जिंकले. तर गौरव, यशोदीप भोगे, अलोक गुरव आणि गणेश मिसाळ यांनी १९४८ गुणांसह ब्राँझपदक पटकावले. 

बारावीची परीक्षा असतानाही सराव थांबवला नव्हता. परीक्षेच्या आदल्या दिवशीही एक तास सराव सुरूच ठेवला होता. नियमित योग्य प्रकारे सराव केल्यामुळेच हे यश मिळाले.
- गौरव लांबे

Web Title: gaurav lambe gold medol