जर्मनीला विजयाचे समाधान दुबळ्या सौदी अरेबियाविरुद्ध निसटता विजय 

वृत्तसंस्था
रविवार, 10 जून 2018

जगज्जेत्या जर्मनीला अखेर विश्‍वकरंडक स्पर्धेच्या सराव सामन्यातील विजयाचा दुष्काळ संपवल्याचे समाधान लाभले. त्यांनी या वर्षातील पहिलाच विजय मिळविताना सौदी अरेबियाचे कडवे आव्हान 2-1 असे परतवले. 

माद्रिद - जगज्जेत्या जर्मनीला अखेर विश्‍वकरंडक स्पर्धेच्या सराव सामन्यातील विजयाचा दुष्काळ संपवल्याचे समाधान लाभले. त्यांनी या वर्षातील पहिलाच विजय मिळविताना सौदी अरेबियाचे कडवे आव्हान 2-1 असे परतवले. 

काही दिवसांवर आलेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील लढतीत इराण, क्रोएशिया, स्वित्झर्लंडनेही बाजी मारली; पण त्याच वेळी पोलंडला चिलीविरुद्ध 2-2 बरोबरी स्वीकारावी लागली. तीन दशकांत प्रथमच सलग पाच लढतींत जर्मनीस विजय लाभला नव्हता. त्यांनी ही कटू मालिका संपवण्याच्या उद्देशाने सुरवात केली. विश्रांतीस 2-0 आघाडी घेतली; पण त्यानंतर त्यांनी सौदीचा प्रतिकार जेमतेमच रोखला. 

सामन्याच्या अंतिम टप्प्यात सौदीने आपण काय करू शकतो, याची झलकच फुटबॉल जगतास दिली. त्यांनी बचावावर भर देण्यास जर्मनीस भाग पाडले. एवढेच नव्हे तर हा बचाव वारंवार भेदलाही. भरपाई वेळेत सौदीची पेनल्टी किकची जोरदार मागणी फेटाळली गेली आणि जर्मनीने सुटकेचा नि:श्‍वास सोडला. 

गोलच्या संधी सोडल्या. बचावात अनेक जागा सोडत प्रतिस्पर्ध्यांना आक्रमणाची संधी दिली. नशिबाची साथ असल्यामुळेच जिंकलो, असे जर्मनीचे मार्गदर्शक लोव यांनी सांगितले. त्याच वेळी प्रत्यक्ष स्पर्धेत नक्कीच प्रभावी कामगिरी होईल, असा दिलासा दिला. 

दरम्यान, क्रोएशियाने सुरवातीच्या पिछाडीनंतर सेनेगलला नमवले. स्वित्झर्लंडने स्पर्धेची चांगली तयारी करताना जपानचा 2-0 पाडाव केला. अखेरच्या मिनिटात गोल करीत इराणने लिथुआनियास हरवले. 

मैदानाबाहेर वादाचाही सामना 
लिकाय गुदॉगान याची जर्मनी पाठीराख्यांनी पुन्हा हुर्यो उडवली. तो मेसुत ओझीलप्रमाणेच तुर्किश वंशाचा आहे. त्याने गेल्या महिन्यात तुर्की अध्यक्षांबरोबरील आपले छायाचित्र ट्‌विट करताना त्यासोबत माय प्रेसिडेंट अशी टिप्पणी केली. त्यामुळे जर्मनीत संतापाची लाट उसळली. गुदागॉन जर्मनी संघातील सदस्य आहे. त्याची हुर्यो उडवून काहीही साध्य होणार नाही, असे जर्मनीचे मार्गदर्शक जोशीम लोव यांनी सांगितले. 

 

Web Title: Germany 2-1 Saudi Arabia, 5 Talking Points