फ्रेंच बॅडमिंटनचे चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

पॅरिस - जागतिक बॅडमिंटनमध्ये दबदबा असला, तरी यंदाच्या वर्षात एकाही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यात भारताच्या पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल, किदांबी श्रीकांत यांना अपयश आले आहे. गेल्याच आठवड्यात डेन्मार्क ओपन स्पर्धेत सिंधू पहिल्याच फेरीत हरली, साईना अंतिम फेरीपर्यंत पोचली, श्रीकांतही उपांत्य फेरीपर्यंत पोचला. पण, त्यानंतरही हाती काहीच लागले नाही. या पार्श्‍वभूमीवर आता प्रमुख मदार असलेले हे भारतीय बॅडमिंटनपटू फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धेचे चक्रव्यूह भेदणार का, याची उत्सुकता आहे.

डेन्मार्क ओपन स्पर्धेनंतर आता लगेचच फ्रेंच स्पर्धेचे आव्हान भारतीय खेळाडूंच्या शारीरिक तसेच मानसिकतेची कसोटी पहाणारे ठरणार आहे. सिंधू असो वा साईना विजेतेपदाचा फेरा त्यांना पार करता आलेला नाही. कधी कॅरोलिना मरिन, यामागुची, तर कधी ओकुहारा, तई त्झु यिंग या खेळाडू अडथळा ठरत आहेत. या सर्वांचे आव्हान फ्रेंच स्पर्धेत असणार असल्यामुळे भारतीयांना पुन्हा एकदा सर्वस्व पणास लावावे लागेल.

जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानी असलेल्या साईनाने मोठी झेप घेत डेन्मार्क स्पर्धेची अंतिम फेरी गाठली, परंतु अव्वल मानांकित तई त्झु यिंगला ती पुन्हा पराभूत करू शकली नाही. या स्पर्धेत श्रीकांतनेही उपांत्य फेरी गाठली होती, त्यामुळे सर्वप्रथम त्यांना तंदुरुस्ती दाखवून द्यावी लागेल. 
डेन्मार्क स्पर्धेत सिंधूचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले होते. तो धक्कादायक पराभव मागे टाकून सिंधूला फ्रेंच स्पर्धेत आपला खेळ कमालीचा उंचावावा लागेल. सिंधूचा पहिल्या फेरीत सामना ११ व्या मानांकित बिवेन झॅंगविरुद्ध होणार आहे; तर ३७ वी मानांकित सिएना कावाकामी ही साईनाची सलामीची प्रतिस्पर्धी असेल. गेल्या आठवड्यात झेंगने सिंधूला हरवले होते, त्यामुळे आता सिंधूला कमालीचे सावध राहावे लागेल.

पुरुषांमध्ये श्रीकांतसह बी साई प्रणीत, समीर वर्मा यांच्यावर भारताची मदार असेल. डेन्मार्क स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत समीर आणि श्रीकांत हे आपलेच खेळाडू एकमेकांविरुद्ध भिडले होते. मॅरेथॉन लढतीत समीरचा पराभव झाला होता.

Web Title: Global Badminton Competition