राष्ट्रकुल स्पर्धेला  भावपूर्ण निरोप

वृत्तसंस्था
सोमवार, 16 एप्रिल 2018

गोल्ड कोस्ट - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यात ऑस्ट्रेलियाचा इतिहास आणि परंपरेचे दर्शन घडविण्यात आले, तर रविवारी समारोप सोहळ्याला भावनिक किनार लाभली. सहभागी खेळाडू आणि स्पर्धा यशस्वी करण्यात वाटा उचलणाऱ्या अनेक हातांना या वेळी निरोप देण्यात आला. 

गोल्ड कोस्ट - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यात ऑस्ट्रेलियाचा इतिहास आणि परंपरेचे दर्शन घडविण्यात आले, तर रविवारी समारोप सोहळ्याला भावनिक किनार लाभली. सहभागी खेळाडू आणि स्पर्धा यशस्वी करण्यात वाटा उचलणाऱ्या अनेक हातांना या वेळी निरोप देण्यात आला. 

समारोप सोहळ्यालाही कॅर्रारा स्टेडियम भरगच्च होते. विविध देशांतील हजारो खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांनी मैदानावर येत या चाहत्यांचा निरोप घेतला. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या अध्यक्षा ल्युसी मार्टिन यांनी स्पर्धेच्या समारोपाची घोषणा करताना खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘‘खेळाडूंनी आपल्या अपरिमित कौशल्याचे प्रदर्शन करून स्पर्धा यशस्वी केली. त्यांच्या कामगिरीमुळेच ही स्पर्धा लक्षात राहील.’’ या वेळी त्यांच्या हस्ते या पुढील २०२२च्या स्पर्धांचे आयोजन असलेल्या बर्मिंगहॅम शहराचे मेयर ॲने अंडरवूड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या विविध गायकांनी आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांसह खेळाडूंनाही ठेका धरायला लावला. खेळाडूंबरोबर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सुमारे १५ हजार स्वयंसेवकांच्याही मेहनतीचा उल्लेख करून त्यांना धन्यवाद देण्यात आले. 

भारताचे नेतृत्व मेरी कोमकडे
उद्‌घाटन सोहळ्यात बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधूने भारतीय पथकाचे नेतृत्व केले. समारोप सोहळ्यात हा मान राष्ट्रकुल सुवर्णपदकाचे स्वप्न साकार करणाऱ्या बॉक्‍सिंग खेळाडू मेरी कोमला देण्यात आला. अत्यंत उत्साहात भारतीय खेळाडूंनी संचलन करून समारोप सोहळ्यातही प्रेक्षकांची मने जिंकली. 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत
ऑस्ट्रेलिया १९८ पदके मिळवून अव्वल
इंग्लंड १३६ पदकांसह दुसरे
भारत (६६ पदकांसह तिसऱ्या स्थानी)
९ जागतिक, तसेच ९१ स्पर्धा विक्रमांची नोंद
न्यूझीलंडचा वेटलिफ्टर डेव्हिड लिटी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू

Web Title: Gold Coast Commonwealth Games good bye