दीपिकाने संपवला सुवर्ण दुष्काळ 

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 जून 2018

भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारीने अपयशाच्या गर्तेतून बाहेर पडत सोमवारी आपला सुवर्ण पदकाचा दुष्काळ संपवला. विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्हच्या वैयक्तिक अंतिम फेरीत तिने जर्मनीच्या मिशेली क्रोपेन हिचा 7-3 असा पराभव केला. 
 

साल्ट लेक सिटी (अमेरिका) - भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारीने अपयशाच्या गर्तेतून बाहेर पडत सोमवारी आपला सुवर्ण पदकाचा दुष्काळ संपवला. विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्हच्या वैयक्तिक अंतिम फेरीत तिने जर्मनीच्या मिशेली क्रोपेन हिचा 7-3 असा पराभव केला. 

या सुवर्णपदकासह ती या वर्षीच्या मोसमातील अखेरच्या स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. दीपिका यापूर्वी 2011, 12, 13 आणि 15 अशी चार वर्षे जागतिक स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. या चारही वेळेस तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. 

सहा वर्षांपूर्वी 2012 मध्ये अंताल्या येथील स्पर्धेत दीपिकाने अखेरचे सुवर्णपदक मिळविले होते. आजच्या अंतिम लढतीत तिने 29 गुणांनी सुरवात करत मिशेली हिच्याविरुद्ध 2-0 अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत मात्र तिने गुण गमावले. वैयक्तिक गटात प्रथमच अंतिम लढत खेळणाऱ्या मिशेलीने तिसरा सेट जिंकून 3-3 अशी बरोबरी साधली. 

यानंतरही दीपिकाने दडपण न घेता 29 आणि 27 गुणांची कमाई करत चौथा आणि पाचवा सेट जिंकून 7-3 असा विजय मिळविला. या विजयाने उत्साहित झालेली दीपिका म्हणाली, ""अपयश विसरून केवळ खेळाचा आनंद लुटायचा हे मनाला बजावत होते. सर्वोत्तम खेळ करायचा आणि हीच तुझी सर्वोत्तम वेळ आहे असे मनाशी ठरवून अंतिम लढत लढले आणि सुवर्णपदक पटकावले. खूप आनंदी आहे.'' 

दीपिकाला अतानु दासच्या साथीत मिश्र दुहेरीत ब्रॉंझपदकाच्या लढतीत मात्र अपयश आले. तैवानच्या जोडीने त्यांचा 5-4 असा पराभव केला. या स्पर्धेत भारत, अमेरिका, कोलंबिया, तैवान यांच्यानंतर चौथ्या स्थानावर राहिला. भारताने प्रत्येकी एक सुवर्ण, रौप्य आणि ब्रॉंझपदक मिळविले.

Web Title: Golden day for Dipika