राज्य तिरंदाजांचे ऐतिहासिक सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

मुंबई - एकही ऑलिंपियन तिरंदाज नसलेल्या महाराष्ट्राने एकमेकांच्या साथीत प्रभावी कामगिरी करीत  आपल्यापेक्षा सरस संघांना धक्का देत राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेतील पुरुषांच्या रिकर्व्ह स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक जिंकले. दीपिका कुमारीने वैयक्तिक स्पर्धेत बाजी मारली, पण झारखंड संघ अंतिम फेरीत रेल्वेविरुद्ध पराजित झाला.

मुंबई - एकही ऑलिंपियन तिरंदाज नसलेल्या महाराष्ट्राने एकमेकांच्या साथीत प्रभावी कामगिरी करीत  आपल्यापेक्षा सरस संघांना धक्का देत राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेतील पुरुषांच्या रिकर्व्ह स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक जिंकले. दीपिका कुमारीने वैयक्तिक स्पर्धेत बाजी मारली, पण झारखंड संघ अंतिम फेरीत रेल्वेविरुद्ध पराजित झाला.

प्रवीण जाधव, तुषार शेळके, सुखमणी बाबरेकर आणि तन्मय मालुसरेच्या राज्य संघाने निर्णायक लढतीत सेनादलास ६-२ असे हरवून बाजी मारली. तत्पूर्वी महाराष्ट्राने उपांत्य फेरीत मंगलसिंग चाम्पिया आणि राहुल बॅनर्जी या ऑलिंपियनचा समावेश असलेल्या रेल्वेस हरवले होते. अतानू दासचा पेट्रोलियम क्रीडा मंडळ, जयंत तालुकदारचा झारखंड पदकापासून दूर राहिले.   महाराष्ट्राने ३७ वर्षांच्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सांघिक प्रकारात पदक जिंकले आणि तेही सुवर्णपदक आले. तिरंदाजी जास्तीत जास्त लोकप्रिय करण्याच्या प्रयत्नाचे हे यश आहे. सर्वच गटांत राज्याच्या तिरंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे हे यश धक्कादायक नक्कीच नाही, असे राज्य तिरंदाजी संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर यांनी सांगितले. 

फरिदाबादला (हरियाणा) झालेल्या या स्पर्धेत महिला गटात दीपिका कुमारीने आपला दबदबा सिद्ध केला. तिने महिला एकेरीतील निर्णायक लढतीत झारखंडच्याच अंकिता भगतला ६-२ असे हरवले. तिने जयंत तालुकदारच्या साथीत मिश्र दुहेरीत बाजी मारली. त्यांनी निर्णायक लढतीत प्रमिला दाईमेरी-संजय बोरो या आसामच्या जोडीला ५-१ असे हरविले. भाग्यश्री कोलते-प्रवीण जाधव या जोडीने मिश्र दुहेरीत ब्राँझ पदक पटकावले. पुरुष एकेरीच्या निर्णायक लढतीत अतानु दासने अरुणाचल प्रदेशच्या जेमसन सिंगचा ६-२ असा पाडाव केला. 

तिरंदाजांसाठी अमेरिकेतील मानसोपचारतज्ज्ञ
विश्‍वकरंडक तिरंदाजीत प्रभावी ठरणाऱ्या पण जागतिक, ऑलिंपिक तसेच आशियाई स्पर्धेत पदकापासून दूर राहणाऱ्या भारताच्या तिरंदाजांसाठी कायमस्वरूपी अमेरिकेतील मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचा विचार आहे. ही नियुक्ती दीर्घकालीन असेल, असे तिरंदाजी संघटनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मे महिन्यात होणाऱ्या विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेपासून ही नियुक्ती होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Golden State Historic London