सुवर्णाक्षरी ऑलिंपिक

सुवर्णाक्षरी ऑलिंपिक

जगातील विविध देशातील, प्रांतातील, राज्यातील, गावातील प्रत्येक खेळाडूचे ध्येय असते ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्याचे. तेथे विजेतेपदाची माळ गळ्यात पडली की खेळाडू जगप्रसिद्ध होतो. म्हणून खेळाला वाहून घेतलेले खेळाडू कसून तयारी करीत असतो. सरावावर मेहनत, परिश्रम, कष्ट घेत असतो आणि पदक मिळाल्यावर त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. ग्रीसमधील ग्रीक लोकांनी त्यांच्या देवतेच्या पूजनासाठी स्पर्धा सुरू केली. ग्रीकमधील सर्वांत उंच पर्वत ऑलिंपस याच्या नावाशी साधर्म्य असणारे ऑलिंपिक हे नाव त्यांनी या स्पर्धेला दिले. हाच आताच्या दर चार वर्षांनी भरणाऱ्या भव्यदिव्य क्रीडा उत्सवाचा उगम आहे. आठव्या शतकातील ऑलिंपिकपासून 20 व्या शतकापर्यंतचा या स्पर्धेचा इतिहास, त्यातील क्रीडाप्रकार, गाजलेले खेळाडू, त्यांनी केलेले विक्रम, त्यातील अपघात, दुर्दैवी घटना या साऱ्यांचा वेध घेणारी अनेक पुस्तके जगभरात प्रसिद्ध झालेली आहेत. त्यातील बेन्सन बॉबरिक्‍स यांचे "ए पॅशन फॉर व्हिक्‍टरी ः द स्टोरी ऑफ द ऑलिपिंक्‍स इन एन्शंट अँड अर्ली मॉडर्न टाइम्स‘ हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक आहे. "नेमेचि येतो पावसाळा‘ याप्रमाणे दर चार वर्षांनी येणाऱ्या ऑलिंपिकसाठी धावपटू, जलतरणपटू, मैदानी खेळ खेळणारे क्रीडापटू, मुष्टियोद्धे, कुस्तीगीर असे अनेक खेळाडू कशी तयारी करतात, त्यांचे प्रशिक्षण, ऑलिंपिकचा एक भाग असलेले कार्यक्रम याची माहिती बी. जी. हेनेसी यांनी "ऑलिंपिक्‍स‘मधून दिली आहे.
 

स्पर्धा म्हटले की खेळाडूंचे विविध किस्से ऐकायला मिळतात. विजयापर्यंतच्या त्यांच्या कहाण्या सांगितल्या जातात. यात सर्वांत भाग्यवान ठरलेला खेळाडू म्हणजे जेसी ओवेन्स, 1936 मध्ये जर्मनीचा शहेनशहा व जगाच्या दृष्टीने कर्दनकाळ हिटरलच्या काळात बर्लिन ऑलिंपिक स्पर्धा झाली. नाझींकडून ज्यूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध म्हणून अनेक देशांनी या स्पर्धेवर बहिष्कार घातला होता. मात्र, अमेरिकेने तो निर्णय धुडकावून भाग घेतला. यावरून मोठा वाद झाला. पण, आफ्रिकन वंशाच्या अमेरिकी धावपटू जेसी ओवेन्सने चार सुवर्णपदक जिंकून या ऑलिंपिक स्पर्धेत इतिहास रचला. "हिटलरच्या आर्यन साम्राज्य जेसीने एकहाती उद्‌ध्वस्त केले,‘ असे त्या वेळी बोलले जात असे. पुढे जेसीने चार ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक खिशात घालून विक्रम केला. याची कहाणी "ट्रम्प ः द अनटोल्ड स्टोरी ऑफ जेसी ओवेन्स अँड हिटलर ऑलिंपिक्‍स‘मध्ये जेरेमी शाप यांनी चितारली आहे. याच बर्लिन ऑलिंपिंक्‍समध्ये रोईंग या क्रीडा प्रकारात प्रथमच उतरलेल्या अमेरिकेच्या संघातील आठ खेळाडूंच्या सुवर्णपदकाची "द बॉइज इन द बोट ः द नाइन अमेरिकन अँड देअर एपिक क्वेस्ट फॉर गोल्ड ऍट द 1936 बर्लिन ऑलिंपिक‘ ही सुवर्ण कहाणी डॅनिअल जेम्स ब्राऊन यांनी लिहिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com