महाराष्ट्र खेळाडूंना गुजरातची पसंती 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 जून 2018

 प्रो-कबड्डी लीगमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी महाराष्ट्रात बेस असलेले यू मुम्बा आणि पुणेरी पलटणऐवजी गुजरात फॉर्च्यून जायंट्‌सने जास्त पसंती दिली. त्यांनी हैदराबादच्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या महाराष्ट्र संघातील दोन खेळाडूंसह राज्यातील एकूण तीन खेळाडूंना खरेदी केले, त्याचबरोबर त्यांनी यापूर्वीच राष्ट्रीय स्पर्धेसाठी राखीव असलेल्या महेंद्र राजपूतला आपल्याकडे राखले आहे. 
 

मुंबई - प्रो-कबड्डी लीगमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी महाराष्ट्रात बेस असलेले यू मुम्बा आणि पुणेरी पलटणऐवजी गुजरात फॉर्च्यून जायंट्‌सने जास्त पसंती दिली. त्यांनी हैदराबादच्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या महाराष्ट्र संघातील दोन खेळाडूंसह राज्यातील एकूण तीन खेळाडूंना खरेदी केले, त्याचबरोबर त्यांनी यापूर्वीच राष्ट्रीय स्पर्धेसाठी राखीव असलेल्या महेंद्र राजपूतला आपल्याकडे राखले आहे. 

प्रो-कबड्डीत पहिल्या दिवशी खेळाडूंच्या खरेदीत कोटीची उड्डाणे घेतल्यावर दुसऱ्या दिवशीच्या लिलावात यापेक्षा जास्त किंमत अपेक्षित नव्हती. गतमोसमात हरियाणा स्टीलर्सच्या आक्रमक असलेल्या प्रशांत कुमार राय याला दुसऱ्या दिवशीची सर्वाधिक बोली लागली. त्याला 79 लाख मिळाले. पहिल्या दिवसाच्या अ श्रेणीतील खेळाडूंपेक्षा जास्त किंमत लाभली. अर्थात प्रशांतची गतमोसमातील कामगिरी पाहता हे धक्कादायक नव्हते. 

महाराष्ट्राने राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील विजेतेपदाचा दुष्काळ संपवला होता. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील खेळाडूंना किती प्रतिसाद लाभतो, याकडे लक्ष होते. या संघातील तसेच यापूर्वीच्या मोसमात चांगली किंमत लाभलेल्या नितीन मदनेला या वेळी कोणीच खरेदी केले नाही. गुजरातने विकास काळे आणि ऋतुराज कोरवी यांना पंसती दिली. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील फ्रॅंचाईजी असलेल्या यू मुम्बाने सिद्धार्थ देसाईबरोबर आदिनाथ गवळीला खरेदी केले. पुणेरी पलटणने कायम राखलेल्या गिरीश इरनाकव्यतिरिक्त राष्ट्रीय विजेत्या संघातील राखीव खेळाडू अक्षय जाधवला घेतले. 

राष्ट्रीय विजेत्या महाराष्ट्र संघातील खेळाडूंची कमाई 
रिशांक देवाडिगा - 1 कोटी 11 लाख (यू पी. योद्धाज) 
विकास काळे  - 40 लाख (गुजरात फॉर्च्यून जायंट्‌स) 
सचिन शिंगाडे - 20 लाख (हरियाणा स्टीलर्स) 
गिरीश इरनाक - पुणेरी पलटण (कायम राखले) 
विराज लांडगे - 25 लाख (दबंग दिल्ली) 
नितीन मदने - खरेदी नाही 
तुषार पाटील - 20 लाख (पाटणा पायेऱ्टस) 
नीलेश साळुंके - तेलगू टायटन्स (कायम राखले) 
ऋतुराज कोरवी - 30.40 लाख (गुजरात फॉर्च्यून जायंट्‌स) 
सिद्धार्थ देसाई - 36.40 लाख (यू मुम्बा) 
रवी ढगे - खरेदी नाही 
अक्षय जाधव - पुणेरी पलटण 8 लाख 
उमेश म्हात्रे - खरेदी नाही 
महेंद्र राजपूत - गुजरात फॉर्च्यून जायंट्‌स (कायम राखले.) 

राज्यातील अन्य खेळाडू 
शुभम पालकर - 20 लाख (गुजरात) 
विशाल माने - 45 लाख (दिल्ली) 
श्रीकांत जाधव - 37 लाख (यूपी) 
बाजीराव होडगे - 14.6 लाख (जयपूर) 
आदिनाथ गवळी - 8 लाख (यु मुम्बा) 
अनंत पाटील - 8 लाख (जयपूर) 
खरेदी नाही-ः प्रशांत चव्हाण, स्वप्नील शिंदे, नितीन मदने, योगेश सावंत, दुर्वेश पाटील, दादासाहेब आवाड, सुयोग राजापकर, सुलतान डांगे. 

अखेरच्या दिवशी 
-प्रशांत कुमारला यूपीकडून सर्वाधिक 79 लाख 
-ब गटातून चंद्रन रणजित (61.25 लाख), पवन कुमार (42.8 लाख) सर्वाधिक 
- माजी कर्णधार राकेश कुमार कोणालाही नकोसा 
-12 संघांकडून 200 खेळाडूंची खरेदी 
 

Web Title: Gujarat's choice of mahaashtras players for pro kabbadi