WPL 2023 GG vs MI : मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर गुजरातची फलंदाजी अदानींच्या 'शेअर्स' सारखी कोसळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Giants Vs  Mumbai Indian WPL 2023

WPL 2023 GG vs MI : मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर गुजरातची फलंदाजी अदानींच्या 'शेअर्स' सारखी कोसळली

Gujarat Giants Vs Mumbai Indian : वुमन्स प्रीमियर लीगच्या (Women's Premier League) उद्घाटनाच्या सामन्यातच गुजरात जायंट्सच्या खराब खेळाचे धिंडवडे निघाले. मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा पहिल्याच सामन्यात 143 धावांनी पराभव करत WPL 2023 ची दणक्यात सुरूवात केली. नाणेफेक जिंकून गुजरात जायंट्सने प्रथम गोलंदाजी स्विकारली.

मात्र मुंबईने 20 षटकात 5 बाद 207 धावा चोपून गुजरातच्या गोलंदाजीची हवाच काढून घेतली. मुंबईच्या 207 धावांचा पाठलाग करताना गुजरात जायंट्सची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. गुजरातचा संपूर्ण संघ 64 धावात तंबूत परतला.

मुंबईकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने 30 चेंडूत 65 धााव चोपून WPL मधील पहिले अर्धशतक ठोकण्याचा मान पटकावला. तिला हेली मॅथ्यूजने 47 तर एमेलिया केरने 45 धावा करत चांगली साथ दिली. गुजरातकडून स्नेह राणाने 43 धावात 2 बळी टिपले. तर फलंदाजीत गुजरातकडून दयालन हेमलताने एकाकी झुंज देत 29 धावांची खेळी केली. मुंबईकडून इशाकने 11 धावात 4 बळी टिपले.

मुंबईच्या 207 धावांचे अवाढव्य आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरात जायंट्सची टॉप ऑर्डर पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली. इंग्लंडची वेगवान गोलंदाज नॅट सिवर ब्रंट आणि इसी वाँगने भेदक मारा करत गुजरातचे पहिले तीन फलंदाज 5 धावातच मघारी धाडले.

या धक्क्यातून सदरलँड आणि हेमलता यांनी गुजरातला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सैका इशाकने एनाबेल सदलँडचा 6 धावांवर त्रिफळा उडवला. यानंतर इशाकने जॉर्जिया वेअरहॅमची (8) देखील शिकार करत आपला दुसरा बळी टिपला.

इशाकच्या पार्टीत एमेलिया केर देखील सामील झाली. तिने स्नेह राणाला 1 तर तनुजा कनवारला शुन्यावर बाद करत गुजरातची अवस्था 7 बाद 23 धावा अशी केली. यानंतर हेमलताने झुंजार खेळी करत गुजरातला 50 धावांच्या पार पोहचवत लाज वाचवली.

इशाकने आपली चौथी शिकार करत मोनिका पटेलचा 10 धावांवर त्रिफळा उडवला. याचबरोबर गुजरातचा डाव 64 धावात संपुष्टात आला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने पहिल्या धक्क्यानंतर दमदार सुरूवात केली. सलामीवीर हेले मॅथ्यूजने आक्रमक फलंदाजी केली. मॅथ्यूज आणि ब्रंट यांनी दुसऱ्या विकेटसाठी 54 धावांची अर्धशतकी भागीदारी रचत संघाला 9 व्या षटकात 69 धावांपर्यंत पोहचवले. मात्र वॉरहमने नॅट सिवर ब्रंटला 23 धावांवर बाद करत मुंबईला दुसरा धक्का दिला.

यानंतर गार्डनरने मुंबईची सलामीवीर हेले मॅथ्यूजला 47 धावांवर बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. दोन्ही सेट झालेल्या फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर मैदानावर आली. हरमनप्रीतने मुंबईचा डाव सावरत संघाला शतकी मजल मारून दिली. तिने 16 चेंडूत 30 धावा चोपल्या.

हरमनने आपली आक्रमक खेळी अशीच पुढे नेत WPL मधील पहिली हाफ सेंच्युरी मारण्यााचा मान पटकावला. या अर्धशतकाबरोबरच कौर आणि केर यांनी मुंबईली दडशतकी मजल मारून दिली. मात्र 17 व्या षटकात स्नेह राणाने हरमनची ही 30 चेंडूत केलेली 65 धावांची खेळी संपवली.

हरमन बाद झाल्यानंतर एमेलिया केरने नाबाद 45 धावा तर पूजा वस्त्रकारने 8 चेंडूत 15 धावा चोपत मुंबईला 200 चा टप्पा पार करून दिला. यानंतर शेवटच्या चेंडूवर इसी वाँगने षटकार मारत मुंबईला 20 षटकात 5 बाद 207 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....