कर हर मैदान फतेह !

कर हर मैदान फतेह !

खेळपट्टी निर्जीव असो वा हिरवीगार... फिरकीला साथ देणारी असो वा वेगवान गोलंदाजीला... विराट कोहलीला काहीही फरक पडत नाही. कुठल्याही खेळपट्टीवर, कुठल्याही गोलंदाजाचा कुठलाही चेंडू सीमापार धाडण्याचं कौशल्य कोहलीकडं आहे. चेंडू किती वेगानं येत आहे, याचा अचूक अंदाज घेऊन तितक्‍याच तो कौशल्यानं ‘गॅप’मध्ये मारण्यात त्याची हातोटी आहे. सध्याच्या कुठल्याही गोलंदाजाचं आक्रमण निष्प्रभ करण्याची क्षमता त्याच्याकडं आहे. हे फक्त फलंदाजीचं झालं. ‘अव्वल फलंदाज आहे, म्हणून क्षेत्ररक्षण करताना ड्राइव्ह करणार नाही,’ वगैरे भानगड नाहीच..! क्षेत्ररक्षण करताना स्वतःला पूर्ण झोकून देतो तो... पण हे असं चित्र अगदी सुरवातीपासून नक्कीच नव्हतं...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर कोहली इतर नवोदितांसारखाच होता. सर्वसाधारणतः भारतीय क्रिकेटपटूंची असते, तशीच त्याची देहयष्टी आणि देहबोली होती. हे चित्र २०१२ नंतर बदललं... त्या वर्षी ‘आयपीएल’मध्ये शारीरिक तंदुरुस्तीचा कस लागला आणि कोहलीसमोर धोक्‍याची घंटा वाजली... ‘येत्या काळात सतत फलंदाजी करायची असेल, तर आहार आणि व्यायामाला महत्त्व देणं फार गरजेचं आहे,’ हे त्याच्या लक्षात आलं. दोनच वर्षांनी कोहलीला २०१४च्या इंग्लंड दौऱ्यामध्ये सपशेल अपयश आलं. त्या अपयशानंतर कोहलीनं तंत्र सुधारण्यावर भर दिला. 

एखादा झेल घेण्यासाठी ‘चेंडूपर्यंत तुम्ही दीड सेकंदात पोचता की एका सेकंदात’ यावर सगळा खेळ अवलंबून असतो. हा अर्ध्या सेकंदाचा फरक तंदुरुस्तीमुळंच गाठता येतो. एक झेल घेण्यासाठीच्या त्या प्रयत्नांमध्ये त्या खेळाडूचा व्यायाम, त्याची तंदुरुस्ती, त्याचा आहार, मानसिक स्वास्थ्य या सगळ्यांचा परिणाम होत असतो.
- विराट कोहली

या टप्प्यापूर्वीचा आणि नंतरचा विराट यात कमालीचा फरक आहे. आता कोहलीसारखा शिस्तबद्ध खेळाडू सध्याच्या क्रिकेटविश्‍वात नाही. कुठल्याही गोलंदाजाचे ‘भेदक’ अस्त्र निकामी करण्याचं कौशल्य कोहलीनं आत्मसात केलं आहे. लसिथ मलिंगाच्या हुकमी यॉर्करवरही लीलया चौकार मारण्याचं धाडस कोहलीच दाखवू शकतो आणि ट्रेंट बोल्ट किंवा मिचेल स्टार्कचे भेदक ‘इन स्विंग’ मनगटी कौशल्याच्या जोरावर सीमापार धाडण्याचं कौशल्यही तोच दाखवू शकतो. कोहली हा फलंदाजांमधला अष्टपैलू म्हणायला हवा. ‘कॉपी बुक’ पद्धतीनं तर तो खेळू शकतोच; शिवाय हाणामारीची गरज असल्यास तसं खेळण्याचीही त्याची तयारी असते.

फिटनेसला महत्त्व
कोहलीपूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये शारीरिक तंदुरुस्तीला कुणीही इतकं महत्त्व दिलं नव्हतं. ‘फिटनेस’ म्हणजे ‘खेळण्यासाठी तंदुरुस्त’ इतकी साधी-सोपी व्याख्या होती. कोहलीनं हे पूर्ण बदललं. भारतीय क्रिकेटमध्ये ‘फॅड’ मानलं गेलेल्या फिटनेसचे ट्रेंडमध्ये रूपांतर करण्याचं श्रेय कोहलीचंच आहे. जिममध्ये घाम गाळण्याला कोहलीनं ग्लॅमर मिळवून दिलं. ‘ब्रेकफास्ट विथ चॅंपियन्स’ या मुलाखतींच्या कार्यक्रमात कोहलीनं त्याच्या तंदुरुस्तीचं रहस्य उलगडून सांगितलं होतं. गेली अनेक वर्षे कोहलीचा रोजचा आहार ठरलेला आहे. मुळात तो पक्का ‘दिल्लीकर’! तरीही गेली चार वर्षे तो बटर चिकन आणि बटर नानपासून दूर आहे. हे झालं आहाराचं... आहाराइतकाच, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक महत्त्व देतो ते व्यायामाला. त्या मुलाखतीत कोहलीनं सांगितल्याप्रमाणं, स्पर्धा किंवा सामना नसेल, तर रोज चार तास तो जिममध्ये व्यायाम करत असतो. स्पर्धा किंवा दौरा सुरू असेल, तर रोज दीड तास व्यायाम करतो. स्वतः कर्णधारच इतक्‍या शिस्तीनं वागत असल्यामुळं इतर खेळाडूंमध्येही व्यायामाची ‘आवड’ निर्माण झालीच. कारण, इतका ‘फिट’ असल्याचा फायदा काय असतो, हे कोहलीनं स्वतःच्या कामगिरीनं सिद्ध करून  दाखवलं आहे.

कोहली हा २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात सर्वांत खराब कामगिरी करणारा भारतीय फलंदाज होता. कसोटी किंवा एकदिवसीय, दोन्ही प्रकारांमध्ये त्याला खेळपट्टीवर टिकूनही राहता आलं नव्हतं. संघातील त्याच्या स्थानाविषयी सर्वच टीकाकारांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. कोहलीनं आत्मपरीक्षण केलं. पायाच्या हालचाली चुकत असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि आता त्यानं हे ‘फुटवर्क’ कमालीचं सुधारलं आहे.

तंत्रामध्ये बदल
त्या दौऱ्यापूर्वी स्वतःवर धावा करण्याचं मोठं दडपण आल्याचं कोहलीनं एका मुलाखतीत मान्य केलं होतं. त्या अपयशाची त्यानं दोन कारणं सांगितली होती... १. फलंदाजीचं चुकीचं तंत्र, २. स्वतःच्याच अपेक्षांचं ओझं इंग्लंड दौऱ्यानंतर कोहली सर्वांत पहिली कोणती गोष्ट शिकला असेल, तर ती म्हणजे चेंडू सोडून देणं. सुरवातीपासूनच आक्रमक प्रवृत्ती असलेल्या कोहलीसाठी चेंडू न खेळता सोडून देण्याची कला अवगत करणं सर्वांत कठीण होतं. फलकावर धावा लावणं गरजेचं असतंच मात्र फलंदाजाची फिरकी घेणाऱ्या चेंडूचा मान राखून तो सोडून देणेही तितकेच गरजेचं असतं हे कोहलीला आता चांगलंच उमगलं होतं. 

मैदानावर निर्णय घेण्यात कोहली कमी पडत होता आणि हेच त्याच्या वारंवार येणाऱ्या अपयशाचं कारण होतं. समोरून येणारा चेंडू कसा वळणार, तो कसा खेळायचा, त्यासाठी बॅट किती उघडायची हे कोडं कोहलीला इंग्लंडमध्ये सुटलंच नाही. गोलंदाजाच्या हाताकडं लक्ष एकाग्र करणं हे त्याच्या चंचल स्वभावामुळं त्याला पूर्वी कधी जमलंच नाही. डोक्‍याच्या सततच्या विचित्र हालचालींमुळं त्याला गोलंदाजाच्या हाताकडं लक्ष देण्याचं कधी सुचलंच नाही. इंग्लंड दौऱ्यानंतर त्यानं या सर्व आघाड्यांवर कठोर परिश्रम घेतले.  

इंग्लंड दौऱ्यानंतर त्यानं रोज तीन तास फलंदाजीचा सराव करून स्वतःच्या तंत्रात सुधारणा केली. इंग्लंड दौऱ्यात फलंदाजी करताना त्याच्या पायाची पहिली हालचाल ही कव्हर पॉइंटकडं होण्याऐवजी पॉइंटकडं होत होती. इंग्लंड दौऱ्यानंतर त्यानं सरावादरम्यान स्वतःच्या खेळाचं शूटिंग केलं. वेळोवेळी फक्त हेच पाहिले की, चेंडू मारताना पायाची पहिली हालचाल कव्हर पॉइंटकडं होते की नाही. त्यानं दहा दिवस रोज तीन तास हा सराव केला. 

इंग्लंड दौऱ्यात त्याचा खेळासह तो मानसिकरित्याही खचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वीपासून कोहलीकडं एक जमेची बाजू नेहमी होती, ती म्हणजे त्याचा आत्मविश्‍वास. 

इंग्लंड दौऱ्यानंतर कोहलीनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चार शतके झळकाविली. दक्षिण आफ्रिकेतही तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्यानंतर सुरू झालेला कोहलीचा प्रवास आज पाहणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या खेळाचं कौतुक करण्यास भाग पाडत आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर कोशात गेलेल्या सुरवंटाचं आज फुलपाखरू झालं आहे..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com