महाराष्ट्र केसरी 2020 : पुण्याचा 'हॉट फेव्हरेट' अभिजीत कटके स्पर्धेबाहेर!

Sadgir-Katke
Sadgir-Katke

महाराष्ट्र केसरी 2020 : पुणे : महाराष्ट्र कुस्ती केसरी खुल्या गटातील मॅट विभागात नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीर याने पुणे ‌शहरचा अभिजीत कटके याचे डबल महाराष्ट्र केसरीचे स्वप्न सोमवारी (ता.6) भंगले. हर्षवर्धनने अभिजीतला 4-2 गुण फरकाने पराभूत केले.

माती विभागातील अटीतटीच्या लढतीत लातूरच्या शैलेश शेळकेने सोलापूरच्या माऊली जमदाडेवर मात केली. गतवर्षीचा विजेता बाला रफीक शेख याचेही डबल महाराष्ट्र केसरीचे स्वप्न धुळीस मिळाले. उद्या (ता. ७) हर्षवर्धन सदगीर विरुद्ध शैलेश शेळके यांच्यात महाराष्ट्र केसरी गदेसाठी अंतिम लढत होईल. महाराष्ट्राचा ४४ वा महाराष्ट्र केसरी कोण याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. 

दरम्यान, 74 किलो ‌गटातील माती विभागात कोल्हापूर जिल्ह्याच्या अनिकेत चव्हाणने सुवर्णपदक पटकावले.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व सिटी कार्पोरेशनतर्फे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू आहे. बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

अखेरच्या ‌क्षणांत हर्षवर्धन अभिजीतवर भारी...

मॅट विभागात पुणे ‌शहरचा अभिजित कटके विरुद्ध नाशिक जिल्ह्याचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात लढत झाली. अभिजितने पहिल्या फेरीत एकेरी पट काढत एक गुण मिळवला. दुसऱ्या फेरीत हर्षवर्धनने चार गुणांची कमाई केली. अखेरच्या क्षणांत हर्षवर्धनने आक्रमक चाल करत अभिजितवर ताबा मिळवून गुण वसूल केले. तो विजयी होताच प्रेक्षकांनी त्याला टाळ्यांची दाद दिली.  

पंधरा सेकंदात शैलेशची कमाल...

माती विभागात सोलापूरचा माऊली जमदाडे व लातूरच्या शैलेश शेळके यांच्यातील लढतीकडे प्रेक्षकांचे लक्ष होते. पहिल्या फेरीत माऊलीने आक्रमक चाल केली. ती परतवून लावताना शैलेश त्याला बॅक थ्रो केला. लगेचच माऊलीने चार गुणांची कमाई केली. 

पुन्हा माऊलीने शैलेशवर ताबा मिळवून तब्बल आठ गुण मिळवले. तोडीस तोड डावपेच करताना अखेरच्या क्षणांत तो माऊलीवर भारी पडला. विजयी झाल्यानंतर त्याने वस्ताद काका पवार यांना खांद्यावर घेऊन मैदानात फेरी मारली.

हर्षवर्धनपुढे ‌सचिनचा गुण तक्ता कोरा...

तत्पूर्वीच्या ‌मॅट विभागातील लढतीत नाशिक जिल्ह्याचा हर्षवर्धन सदगीर विरुद्ध मुंबई उपनगरचा सचिन येलभर यांच्यात लढत झाली. 

पहिल्या फेरीत हर्षवर्धनने एक गुण मिळवला. दुसऱ्या फेरीतही दुहेरी पट काढत त्याने सचिनवर ताबा मिळवला. सचिनला एकही गुण वसूल करता आला नाही. हर्षवर्धनने 6-0 ने लढत जिंकली.  

अभिजितची सागर बिराजदारवर मात...

पुणे शहरचा अभिजित कटके विरुद्ध लातूरचा सागर बिराजदार यांच्यातील लढत ‌तुफानी‌ होईल, अशी प्रेक्षकांना अटकळ होती. पहिल्या फेरीत अभिजितने एक गुण वसूल केला. दुसऱ्या फेरीत त्याने फारसे आक्रमक डाव न करता सागरवर विजय मिळवला.

शैलेशची गणेशविरुद्ध चिवट झुंज...

माती विभागात लातूरचा शैलेश शेळके विरुद्ध हिंगोलीचा गणेश जगताप यांच्यातील लढतीने डोळ्यांचे ‌पारणे फेडले. शैलेशने‌ ही लढत 6-4 ने जिंकली. 

हप्ते डावावर माऊलीकडून बाला‌ रफीक शेख चितपट...

बुलढाण्याच्या बाला रफिक शेख विरुद्ध सोलापूरच्या माऊली जमदाडे यांच्या लढतीकडे प्रेक्षकांचे डोळे लागले होते. माऊलीने बालाचा हुकमी हप्ते ‌डाव त्याच्यावरच उलटवून त्याला चितपट केले. या पराभवाने बालाचे डब्बल महाराष्ट्र केसरीचे स्वप्न भंगले.

74 किलो ‌गटात कोल्हापूर जिल्ह्याच्या अनिकेत चव्हाणने सोलापूरच्या आबासाहेब मदनेवर मात केली.  तो मोतीबाग तालमीचा मल्ल आहे. या गटात सांगलीचा श्रीकांत निकम कांस्य पदकाचा मानकरी ठरला.

चौथ्या फेरीत संग्राम पाटील पराभूत झाल्याने कोल्हापूरचे आव्हान संपुष्टात आले. नाशिक जिल्ह्याचा हर्षद सदगीर याने त्याचा १०-०ने पराभव केला. गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असतानाही तो मैदानात लढला. 

क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी स्पर्धेस हजेरी लावली. त्या म्हणाल्या, "महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी मंत्रालयात विशेष बैठक घेऊ. तसेच महाराष्ट्र केसरीसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यासाठीही पावले उचलू." त्यांनी महिलांच्या‌ राज्य कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचा मान रायगडला द्यावा, अशी मागणी केली. त्याला तात्काळ परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी मान्यता दिली.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते माती विभागातील अंतिम लढतीस सुरवात झाली. माती आणि मॅट विभागातील विजेत्यांना त्यांच्या हस्ते पदके देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com