हरियानाचे स्टिलर्स पडले पुणेरी पलटणवर भारी!

वृत्तसंस्था
Monday, 2 September 2019

विकासचे 11 गुण आणि कर्णधार धर्मराजचे 'हाय फाइव्ह', बचावातील रवी कुमारचे चार गुण असे सगळेच हरियानासाठी जुळून आले.

बंगलूर : विकास कंडोलाच्या चढाया आणि त्याला बचाव फळीकडून मिळालेल्या सुरेख साथीच्या जोरावर प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात सोमवारी (ता.2) हरियाना स्टिलर्सने आपली दमदार आगेकूच कायम राखली. त्यांनी पुणेरी पलटण संघाचा 41-27 असा पराभव केला. 

विकास कंडोलाने चढाईमध्ये राखलेले कमालीचे सातत्य यंदा चर्चेचा विषय ठरत आहे. नितीन तोमरच्या सुरवातीच्या चढायांनी पुण्याची सुरवात आश्‍वासक राहिली. पण, त्यांना पुढे संपूर्ण सामन्यात तेवढेच समाधान मिळाले. हरियानाच्या बचावफळीला लय गवसली, तसे तोमर आणि मनजित हे पुण्याचे प्रमुख चढाईपटू अपयशी ठरले. त्यात विकासने आपल्या खोलवर चढायांना पुण्याचा दुबळा ठरत असलेला बचाव आणखी खिळखिळा केला आणि हरियानाचे काम सोपे झाले. 

विकासचे 11 गुण आणि कर्णधार धर्मराजचे 'हाय फाइव्ह', बचावातील रवी कुमारचे चार गुण असे सगळेच हरियानासाठी जुळून आले. पुण्याकडून तोमरचे 8 आणि सुरजितचे पाच गुण झाले. मात्र, दोन लोण, चढाईतील 21-18 आणि बचावातील 14-8 ही पिछाडी पुण्याला कधीच भरून काढता आली नाही.  

तेलुगूचा विजय 
आजच्या दुसऱ्या सामन्यात तेलुगू टायटन्सने अचूक नियोजनाच्या जोरावर तमिळ थलैवाजचे आव्हान 35-30 असे परतवून लावले. प्रमुख चढाईपटू अजय ठाकूरच्या गैरहजेरीत तमिळची दुबळी पडणारी बाजू आज तमिळनाडूच्या अजित कुमारने सावरून घेतली होती. मात्र, मनजित चिल्लर, मोहित चिल्लर यांच्याकडून बचावात झालेल्या चुकांचा त्यांना फटका बसला. अजितकुमारने 14 गुणांची कमाई केली. चढाईच्या आघाडीवर 21-22 आणि बचावात 9-8 असे निसटते वर्चस्व तेलुगूने राखले होते.

त्याचबरोबर एका लोणचाही त्यांना फायदा झाला. मात्र, त्यांचे नियोजन सर्वात महत्त्वाचे ठरले. त्यांनी सिद्धार्थ देसाई, फरहाद मिलाघर्डन, आरमान आणि सूरज देसाई या चढाईपटूंचा आलटून पालटून सुरेख वापर केला. त्याचवेळी विशाल भारद्वाजचे बचावातील 6 गुणही तेलुगूसाठी महत्त्वाचे ठरले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haryana Beat Puneri by 41 vs 27