रेंज अंधारल्यानंतरही हीना-जितूला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

मिश्र दुहेरीचा अजूनही अभ्यासच करीत आहे. समन्वयात काही अडचणी आल्या; पण एकदा नियम पूर्णपणे समजल्यावर लक्ष जास्त केंद्रित होईल व सरावही चांगला होईल.
- जितू राय

मुंबई/दिल्ली - मुंबईकर हीना सिद्धू आणि जितू राय यांनी नवी दिल्ली विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करताना १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात सुवर्णपदक जिंकले. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पुरुष आणि महिला क्रीडापटूंची संख्या समान करण्यासाठी मिश्र प्रकाराच्या स्पर्धा होणार आहेत. त्याच प्रकारातील भारताचे पहिले पदकच नव्हे; तर सुवर्णपदकही जिंकण्याचा पराक्रम हीना - जितूने केला; मात्र याच स्पर्धेच्या वेळी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही स्पर्धा दीड तास उशिरा सुरू झाली.

हीना - जितूच्या कामगिरीची अधिकृत नोंद होणार नाही. अद्यापही या स्पर्धेस चाचणी स्पर्धेचा दर्जाच आहे, त्यामुळे त्याची नोंद अधिकृतपणे होणार नाही; मात्र तरीही हे यश महत्त्वाचे आहे. दोन नेमबाजांतील सामंजस्य महत्त्वाचे असलेल्या या प्रकारात भारतीय जोडीने जपानच्या युकारी कोनिशी आणि तामोयुकी मात्सुदा यांना ५-३ असे पराजित करीत सुवर्णपदक पटकावले. उपांत्य फेरीत भारतीय जोडीने पिछाडीवरून बाजी मारली; पण अंतिम फेरीत कधीही आघाडी गमावली नाही.

ही स्पर्धा डॉ. कर्णी सिंग रेंजची निगा राखत असलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणासही जागे करणारी होती. अंतिम फेरी सकाळी १०.३० वाजता होणार होती; पण ती त्याच सुमारास शॉर्टसर्किट होऊन रेंजचा विद्युतपुरवठा खंडित झाला. रेंज बंदिस्त असल्यामुळे सर्वत्र अंधार झाला आणि अखेर १२ वाजता अंतिम फेरी सुरू झाली. परदेशी नेमबाज तसेच पदाधिकाऱ्यांसाठी हे धक्कादायकच होते. यामुळे नेमबाजांचे लक्ष्य विचलित होते, अशी तक्रार काही नेमबाजांनी केली; मात्र अखेर या स्पर्धेचा शेवट भारतीयांसाठी सुखद झाला. अभिनव बिंद्रा अध्यक्ष असलेल्या समितीनेच तीन प्रकाराच्या मिश्र दुहेरी स्पर्धा घेण्याची सूचना केली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने मंजुरी दिल्यानंतरच मिश्र प्रकाराच्या स्पर्धा अधिकृतपणे सुरू होतील.

ही सुरवात सुखावणारी - हीना
मिश्र दुहेरी हा नेमबाजीतील प्रकार नवा आहे. त्यात एकमेकांबरोबरचे सामंजस्यही महत्त्वाचे आहे. त्यातच स्पर्धेत रस निर्माण करण्यासाठी त्यातील चुरस वाढवली आहे. हे सर्व लक्षात घेतल्यास या नव्या प्रकारातील ही विजयी सुरवात सुखावणारी आहे, असे हीना सिद्धूने ‘सकाळ’ला सांगितले.

या स्पर्धेत सहकाऱ्याच्या कामगिरीकडेही लक्ष जाणे स्वाभाविकच आहे; मात्र त्याच वेळी आपली कामगिरी सर्वोत्तम होईल, याकडेही लक्ष केंद्रित करावे लागते. जाहीर स्कोअरपासून प्रोत्साहन कसे घेता येईल हे महत्त्वाचे आहे. अर्थातच, भविष्याच्या दृष्टीने सामंजस्य वाढवण्यासाठी योजना तयार करावी लागेल, असेही तिने सांगितले. पदकाची अपेक्षा होती का नव्हती, हे सांगण्यापेक्षाही पदक जिंकण्याचा आत्मविश्वास होता, असे म्हणणे जास्त योग्य होईल. 

मी व जितू यापूर्वी जागतिक क्रमवारीत अव्वल राहिलो आहोत. दडपणाखालीही चांगले यश मिळवले आहे. भविष्यातही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. पदक हे प्रतिस्पर्धी काय करतात त्यावरही अवलंबून असते, त्यानंतरही हे यश नक्कीच सुखावणारे आहे, असेही ती म्हणाली.

Web Title: Heena Sidhu and Jitu Rai