400 मीटरमध्ये हिमाचे ऐतिहासिक सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेतील भारताचा ट्रॅक प्रकारातील सुवर्णपदकाचा दुष्काळ हिमा दासने गुरुवारी संपुष्टात आणला. तिने 20 वर्षांखालील जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत 51.46 सेकंद अशी वेळ देताना सुवर्णपदकावर नाव कोरले. 

नागपूर : आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेतील भारताचा ट्रॅक प्रकारातील सुवर्णपदकाचा दुष्काळ हिमा दासने गुरुवारी संपुष्टात आणला. तिने 20 वर्षांखालील जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत 51.46 सेकंद अशी वेळ देताना सुवर्णपदकावर नाव कोरले. 

भारताने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स महासंघातर्फे आयोजित विश्‍व ऍथलेटिक्‍स स्पर्धेत सिनिअर, ज्युनिअर व युवा गटात मिळवून पाच पदके जिंकली आहेत. मात्र, ही पाचही पदके फिल्ड इव्हेंटमधील आहेत. ट्रॅक इव्हेंटमधील हे पहिलेच यश सोनेरी ठरले. 18 वर्षीय हिमाने गेल्या वर्षी नैरोबी येथे झालेल्या विश्‍व युवा स्पर्धेत दोनशे मीटर शर्यतीत पाचवे स्थान मिळवले होते. 

निपुन दास यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या हिमाने चौथ्या लेनमधून पळताना संथ प्रारंभ केला. शेवटचे शंभर मीटर अंतर शिल्लक असताना तिने नेहमीप्रमाणे वेग वाढवून सुवर्णपदकाला गवसणी घातली. रुमानियाच्या आंद्रीया मिक्‍लोसने हिमाला गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला 52.07 सेकंदात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अमेरिकेची मॅन्सन टेलर ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली. 

प्रथमच अंतिम फेरी 
स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत मुलींच्या चारशे मीटर शर्यतीत भारतातर्फे फक्त चार खेळाडूंनी भाग घेतला. त्यात पहिल्याच प्रयत्नात हिमाने अंतिम फेरी गाठली. यापूर्वी सपींदर कौर, एम. आर. पुवम्मा (दोनदा) आणि जिस्ना मॅथ्यू यांना पहिल्या फेरीतच माघारी परतावे लागले होते. यंदा जिस्नाने उपांत्य फेरी गाठली होती. 1986 च्या पहिल्या स्पर्धेत राजवंत कौरचे नाव पाठविण्यात आले होते. मात्र, तिने प्रत्यक्ष सहभाग घेतला नव्हता. 
 

Web Title: Hima Das wins gold in Under-20 World Athletics