Soham More : पुण्याच्या पठ्ठ्याची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड hinjewadi wrestler soham more asia wrestling competition selected in indian team | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wrestler Soham More

Soham More : पुण्याच्या पठ्ठ्याची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

हिंजवडी - जूनमध्ये किर्गिझस्थान (बिस्केक) येथे होणाऱ्या १७ वर्षाखालील ग्रीकोरोमन आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाची नुकतीच निवड झाली. या संघात आयटी जवळील मारुंजी येथील पै. अमोल बुचडे कुस्ती अकादमीतील पै. सोहम मोरे याने स्थान मिळविले आहे. ७१ किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याची निवड झाली आहे.

या स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघ निवड चाचणीचे आयोजन अस्थायी समिती अखिल भारतीय कुस्ती महासंघाने बुधवारी (ता. १७) खुल्या पद्धतीने पतियाळा पंजाब येथे केले होते. या चाचणी स्पर्धेत देशभरातील विविध वजन गटातून अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चारशे खेळाडू सहभागी झाले होते. होते. तर महाराष्ट्रातून अनेक कुमार खेळाडूंसह सोहम मोरेने ७१ किलो वजन गटात सहभाग घेऊन हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशच्या पैलवानांनां आस्मान दाखवून भारतीय स्तरावरील महाराष्ट्राच्या कुस्तीचा दबदबा कायम राखला आहे.

सोहम हा कुस्तीगीर रुस्तम-ए-हिंद पै.अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पाचवर्षांपासून सराव करत आहे. त्याने आजवर राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके मिळविली आहेत. त्याला प्रा. किसन बुचडे, प्रशिक्षक नरेंद्र कुमार, पवन गोरे, विनोद गोरे, प्रा. संतोष पवार यांचे मार्गदर्शन लाभले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कपिल बुचडे, उत्कर्ष काळे, समीर देसाई, मिलिंद झोडगे, महेश घुले या पैलवान मंडळींनी त्याचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.