झोपडीत सुवर्णोदय

झोपडीत सुवर्णोदय

नागपूर - चारुलता नायगावकर, माधुरी, स्वाती गुरनुले, मोनिका-रोहिणी राऊत, ज्योती चौहानसह अनेकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नागपूर शहराला नावलौकिक मिळवून दिला. या सर्व धावपटूंची आर्थिक स्थिती बेताचीच होती. त्यात आणखी एका धावपटूची भर पडली  आहे. ती म्हणजे गुरुवारी गुलबर्गा (कलबुर्गी) येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ  क्रॉस कंट्री स्पर्धेत महिलांच्या दहा किलोमीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या प्राजक्ता गोडबोलेची. 

संत्रानगरीसोबतच लांब पल्ल्याच्या धावपटूंचे शहर अशी नागपूरची ओळख आहे. गेल्या काही वर्षांपासून हे बिरुद दुरावत चालले होते. त्यामुळे प्राजक्ताच्या सुवर्णपदकाला विशेष महत्त्व आहे. स्पर्धेत ती जिंकल्याचा निरोप येताच सिरसपेठ येथील (लोकांची शाळेसमोरील अम्माच्या दवाखान्याच्या मागे) घरी आनंदोत्सव सुरू झाला. एका अरुंद गल्लीत टिनाचे छप्पर असलेल्या घरात ती राहते. क्‍लबमधील काही सहकारी, प्राजक्ताची आई, बहीण घरीच होते. एक खोली  आणि स्वयंपाकघर एवढीच जागा. भिंतीवर प्राजक्ताने आतापर्यंत जिंकलेली पदके लटकत होती, करंडक ठेवले होते. 

या जागी पूर्वी झोपडपट्टी होती आणि गोडबोले परिवार येथे चार पिढ्यांपासून राहत आहे, अशी माहिती मिळाली. आजारपणामुळे वडील घरीच असतात. आई घरचा आर्थिक गाडा ओढते. बाजूलाच प्राजक्ताच्या काकांचे घर. प्राजक्ताच्या चुलत बहिणी कबड्डी खेळतात. कबड्डीमुळे त्यांना पोलिस दलात नोकरी मिळाली. प्राजक्तालाही तिच्या कामगिरीच्या जोरावर नोकरी मिळावी, अशी अपेक्षा तिच्या आईने व्यक्त केली. 

प्राजक्ता गोडबोलेची ऐतिहासिक कामगिरी
मोजके अपवाद वगळता गेल्या एक दशकात नागपूरच्या ॲथलिट्‌सला राष्ट्रीय पातळीवर नेत्रदीपक यश मिळू शकले नाही. आज गुलबर्गा (कलबुर्गी) येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राजक्ता गोडबोलेने महिलांच्या दहा किलोमीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. तिच्या या कामगिरीमुळे पुन्हा एकदा नागपूरचा सुवर्णकाळ परत येण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. 

प्राजक्ताच्या सुवर्णपदकामुळे नागपूर विद्यापीठाला तब्बल सतरा वर्षांनंतर सुवर्णपदक जिंकण्यात यश आले. यापूर्वी २००१ च्या हिस्सार स्पर्धेत स्वाती गुरनुलेने शेवटचे सुवर्ण जिंकले होते. तसेच २००५ च्या अंबरनाथ येथील स्पर्धेत निशा वानखेडेने ब्राँझपदक जिंकले होते. ते नागपूर विद्यापीठाचे अखिल भारतीय क्रॉस कंट्रीतील शेवटचे पदक होते. त्यामुळे २२ वर्षीय प्राजक्ताच्या सुवर्णपदकाला विशेष महत्त्व आहे. नागपुरातील सिरसपेठ परिसरात चंद्रमौळी झोपडीत राहणाऱ्या प्राजक्ताने यंदा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत जे. एम. पटेल भंडाराचे प्रतिनिधित्व केले. नेहमी अर्ध मॅरेथॉन शर्यतीत भाग घेणाऱ्या आणि गेल्या दोन वर्षांपासून सुनील कापगते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या प्राजक्ताने इतर प्रतिस्पर्ध्यांना चांगेलच मागे टाकीत ३५ मिनिटे ४५.९८ सेकंदात शर्यत पूर्ण केली. 

या स्पर्धेत महिला शर्यतीत नागपूरच्या धावपटूंचे वर्चस्व दिसून आले असे म्हटले तर वावगे  ठरणार नाही. कारण तिसरे व चौथे स्थान मिळविणारी मंगलोर विद्यापीठाची ज्योती चौहान  व शीतल भगत या दोघी नागपूरच्याच. दोघींच्या कामगिरीमुळे मंगलोरला सांघिक रौप्यपदक जिंकता आले. दीनदयाल उपाध्याय विद्यापीठ गोरखपूरच्या फुलन पालला तिसरे स्थान मिळाले.नागपूरच्या पुरुषांची कामगिरी नेहमीप्रमाणे निराशजनक राहिली. 

कॅटरर्सकडे स्वयंपाक करून घरचा गाडा चालविणाऱ्या प्राजक्ताच्या आईनेही मुलीच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. पेढे वाटून त्यांनी आपला आनंद साजरा केला. घरची आर्थिक स्थिती नाजूक असली तरी केवळ मेहनतीच्या जोरावर प्राजक्ताने आजपर्यंत यश मिळविले आहे. त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी मेहनत केल्यास यश मिळतेच, हेच प्राजक्ताच्या सुवर्णपदकाने  पुन्हा एकदा सिद्ध केले. 

या पदकासाठी खूप मेहनत घेतली. केवळ आणि केवळ कठोर मेहनतीचे फळ आहे. अखिल भारतीय पातळीवर सुवर्णपदक जिंकणाऱ्या मोजक्‍या दिग्गजांत समावेश झाला याचा आनंद आहे. भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे. त्यामुळे माझ्या कामगिरीचा सहानभूतीपूर्वक विचार करून शासनाने नोकरी द्यावी,  अशी माफक अपेक्षा आहे. 
प्राजक्ता गोडबोले

नागपूरच्या महिलांची कामगिरी (१० कि.मी.)
प्राजक्ता गोडबोले (३५ मिनिटे ४५.९८ सेकंद-प्रथम), निकिता राऊत (३८ मि.००.२२ सेकंद-नववी), ऋतुजा शेंडे (३८मि.२६.७१ से.-चौदावी), गीता चाचेरकर (५७वी).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com