भारताचा गोलांचा षटकार; मलेशियाचा धुव्वा

hockey
hockey

मुंबई : आशिया कप हॉकी स्पर्धेतील सुपर फोर्सच्या सलामीच्या लढतीतील चुकांपासून शिकत भारताने मलेशियाविरुद्ध अर्धा डझन गोल केले. मलेशियाविरुद्धच्या या विजयामुळे भारतास आता अंतिम फेरीसाठी अखेरच्या सुपर फोर्स लढतीत पाकविरुद्ध बरोबरी पुरेशी आहे. भारताच्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्या पाकिस्तानला अद्याप सुपर फोर्समध्ये विजयच गवसलेला नाही. 

ढाक्‍यातील या स्पर्धेत कोरियाविरुद्ध गोलक्षेत्रात सातत्याने प्रवेश केल्यावरही गोलच्या संधी निर्माण करता येत नव्हत्या. प्राप्त संधीचा फायदा घेता येत नव्हता. याची पुनरावृत्ती भारताने सहज टाळली. त्याचबरोबर मलेशियाविरुद्धची पराभवाची हॅट्ट्रिक टाळताना गोलांची आतषबाजीच केली. पहिल्या दिवशी मलेशियाने पाकला पराजित केले होते, तर भारताला रोखलेल्या कोरियाची पाकविरुद्धची लढत बरोबरीत सुटल्याने मलेशिया भारतास धक्का देऊन अग्रस्थान मिळवण्याचे स्वप्न पाहात होते; पण काही मिनिटांतच त्यांना भारताची ताकद कळली. 

या वर्षाच्या सुरवातीस मलेशियाने भारताविरुद्धच्या सलग दोन लढती जिंकल्या होत्या; पण ढाक्‍यातील मौलाना बाषानी हॉकी स्टेडियमवर भारतीय मलेशियास आक्रमणाचीही फार संधी देत नव्हते. आकाशदीप, हरमनप्रीत, एस. के. उथप्पाने पूर्वार्धात, तर गुरजांत सिंग, एस.व्ही. सुनील आणि सरदार सिंगने उत्तरार्धात गोल झळकावत मलेशियास त्यांची क्षमता दाखवून दिली. 

पाकविरुद्धच्या विजयाने आत्मविश्वास उंचावलेल्या मलेशियाने अतिआक्रमक सुरवात करत भारतास धक्का दिला खरा; पण भारताने सुरवातीस प्रतिआक्रमणाने उत्तर दिले. चौदाव्या मिनिटास बरोबरीची कोंडी फोडताना पाच मिनिटांत दोन गोल केले. या वेळी गोलक्षेत्रातील भारतीयांचे सामंजस्य जबरदस्त होते. 

दुसऱ्या सत्रातही मलेशियाचे खेळाडू सुरवातीस जास्त आक्रमक होते; पण ते गोल करू शकले नाहीत. सूरज करकेराच्या अभेद्य गोलरक्षणास बचावफळी चांगली साथ देत होती. मलेशियाची आक्रमणे रोखायची आणि ते काहीसे निराश झाल्यावर त्यांना ताकदवान आक्रमण करून हादरा द्यायचा, ही भारतीय चाल चांगलीच यशस्वी ठरली. हाच धडाका तिसऱ्या सत्रातही सुरूच राहिला. 

भारतीयांसाठी चौथे सत्र चिंतेचे ठरले. त्यात गोलरक्षक आकाश चिकटेकडून चुका झाल्या. भारतीय बचावही कोलमडला. त्यामुळे मलेशियाने अखेरच्या दहा मिनिटांत दोन गोल केले. सामन्यातील अखेरचा गोल भारताने केला खरा; पण या दहा मिनिटांतील खेळ भारतास नक्कीच कधीही गाफील राहून चालत नाही, हेच शिकवणारा होता. 

पाकिस्तानचा विजयांचा दुष्काळ 
सुपर फोर्समधील दोन सामन्यांत अवघा एक गुण असलेला पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांनी मलेशियाविरुद्ध पहिल्या दिवशी हार पत्करली होती, तर आज कोरियाविरुद्धची लढत कशीबशी बरोबरीत सोडवली. यामुळे त्यांचा दोन सामन्यात एकच गुण आहे, तर कोरियाचे दोन सामन्यांत दोन गुण आहेत. भारताचे चार, तर मलेशियाचे तीन गुण आहेत. त्यामुळे भारतास अंतिम फेरीसाठी बरोबरीही पुरेशी आहे. 

निकाल जोड 
कोरिया 1 वि. पाकिस्तान 1 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com