हॉकी प्रशिक्षकांची संगीतखुर्ची 

harendra-singh
harendra-singh

नवी दिल्ली - आठ महिन्यांतच हॉकी इंडियाने प्रशिक्षकपदांचे पत्ते पिसले आहेत आणि त्यात हरेंद्रसिंग यांच्याकडे पुरुष संघाची जबाबदारी आली आहे. गतवर्षी 8 सप्टेंबरला पुरुष संघाऐवजी महिला संघाची सूत्रे दिल्याने हरेंद्रसिंग नाराज होते. ते प्रशिक्षकपद स्वीकारण्यास तयार नव्हते. आता 1 मे रोजी हरेंद्र यांनी मरीन यांची जागा घेतली आहे, तर मरीन यांना पुन्हा महिला संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. 

हरेंद्र हे दोन दशकांतील भारतीय हॉकी संघाचे 25 वे मार्गदर्शक झाले असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे. रोएलॅंत ऑल्तमन्स यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हॉकी संघ चांगली कामगिरी करीत होता, मानांकन उंचावत होते; तरीही भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीत सातत्याचा अभाव असल्याचे सांगत त्यांना दूर करण्यात आले. हा निर्णय जाहीर करणारे हाय परफॉर्मन्स डायरेक्‍टर डेव्हिड जॉन यांनी काही दिवसांपूर्वी शूअर्ड मरीन यांना पाठिंबा देत तेच मार्गदर्शकपदी कायम राहतील असे सांगितले होते. 
हॉकी इंडियाने मरीन पुरुष संघाचे मार्गदर्शक म्हणून अपयशी ठरल्याची कबुली दिली. मरीन हे महिला संघाचे मार्गदर्शक म्हणून यशस्वी झाले होते. आता पुन्हा त्याच पदावर जात आहेत, असे हॉकी इंडियाने सांगितले. मात्र हरेंद्र महिला संघाचे मार्गदर्शक असताना त्यांनी आशिया कप जिंकला होता. तसेच 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर प्रथमच उपांत्य फेरी गाठली होती. 

राष्ट्रकुल स्पर्धेचा अपवाद सोडल्यास भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली होती. मी योजना तयार करून वरिष्ठ खेळाडूंना सांगत होतो. ते हिंदीत सहकाऱ्यांना समजावून सांगत होते. या पद्धतीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच विश्‍वकरंडक स्पर्धेत नक्कीच यश मिळाले असते. 
- शूअर्ड मरीन, पुरुष संघाचे दूर करण्यात आलेले मार्गदर्शक. 

पुरुष संघास मार्गदर्शन करणे हा एक सन्मान समजतो. महिला संघाची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली होती. हॉकी इंडियाने सोपवलेली नवी जबाबदारी स्वीकारत आहे. भारतीय हॉकी संघास आगामी महत्त्वाच्या स्पर्धांसाठी तयार करण्याकडे लक्ष देणार आहे. 
- हरेंद्र सिंग, भारतीय मार्गदर्शक. 

हरेंद्रसिंग अनुभवी आहेत. सध्याच्या भारतीय संघातील अनेक खेळाडूंना त्यांनी कुमार गटात असताना तसेच हॉकी इंडिया लीगच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. 
- मोहम्मद मुश्‍ताक, हॉकी इंडिया सचिव 

हे आहेत हरेंद्रसिंग 
- भारतीय पुरुष हॉकी संघाची दुसऱ्यांदा जबाबदारी. 
- यापूर्वी 2009 मध्ये पंजाब सुवर्णचषक विजेत्या संघाचेही मार्गदर्शक. 
- त्यानंतर न्यूझीलंड दौरा तसेच सुलतान अझलान शाह स्पर्धेसाठीही जबाबदारी 
- तीन स्पर्धांनंतर हरेंद्र यांच्याऐवजी भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अस्थायी समितीने जोस ब्रासा यांच्याकडे सूत्रे सोपवली. 
- 2013 च्या विश्‍वकरंडक कुमार स्पर्धेसाठी सूत्रे सोपवत हरेंदर यांना पुनरागमनाची संधी. 
- गतवर्षी रोएलॅंत ऑल्तमन्स यांना दूर केल्यावर हरेंद्र यांचे नाव चर्चेत. 
- हरेंद्र यांच्याकडे महिला संघाची जबाबदारी सोपवताना महिला संघाचे मार्गदर्शक शूअर्ड मरीन यांच्याकडे पुरुष संघाची सूत्रे. 
- विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी व्ही. भास्करन यांची सहाय्यक म्हणून नियुक्ती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com