हॉकीत भारताने पाकला लोळविले;7-1ने विजयी !

वृत्तसंस्था
रविवार, 18 जून 2017

चौथ्या क्वार्टरमधील खेळ सुरु होताच आकाशदीप सिंग याने सरदार सिंग याने दिलेल्या उत्कृष्ट पासचा पुरेपुर फायदा उठवित भारतासाठी पाचवा गोल केला! याच्या अक्षरश: पुढच्या मिनिटास परदीप मोर याने आणखी एक गोल डागत ही आघाडी 6-0 अशी केली

लंडन - जागतिक हॉकी लीगच्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारताने आज (रविवार) पाकिस्तानचा 7-1 असा निर्णायक पराभव केला. भारत व पाकिस्तान यांच्यामधील हा तब्बल 160 वा सामना होता. या सामन्यासाठी भारताने आकाश चिकटे याच्याऐवजी गोलरक्षक म्हणून विकास दहिया यालाच खेळविण्याचा निर्णय घेतला.

सामन्याच्या सहाव्याच मिनिटांस अजाझ अहमद याला पाकिस्तानतर्फे खाते उघडण्यासाठी संधी मिळाली होती. मात्र अहमद ही संधी गोलमध्ये रुपांतरित करु शकला नाही. यानंतर भारताच्या परदीप मोर याने मारलेला फटका पाकिस्तानी खेळाडूच्या पायास लागल्याने भारतास पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीत सिंग याने पाकिस्तानी गोलरक्षक अमजद अली याला चकवित चेंडू जाळ्यात ढकलला व भारताचे खाते उघडले. हरमनप्रीत याचा हा स्पर्धेतील दुसरा गोल होता. या गोलमुळे भारतास पहिल्या क्वार्टरमध्ये 1-0 अशी आघाडी मिळाली. दुसऱ्या क्वार्टरचा खेळ सुरु झाल्यानंतर पाकिस्तानला सामन्यातील दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र बिलाल याने मारलेला हा फटकाही पाकिस्तानचे खाते उघडू शकला नाही. याच दरम्यान, भारताला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र यावेळी हरमनप्रीत याने मारलेला फटका अमजद अली याने अडवला.

अर्थात, या "सेव्ह'चा आनंद पाकिस्तान फार काळ व्यक्त करु शकला नाही. यानंतर 10 च मिनिटांच्या आत तलविंदर सिंग याने पाकिस्तानी गोलपोस्टमध्ये दोन गोल डागत भारतास 3-0 अशा मोठ्या आघाडीवर नेले. प्रथम सामन्याच्या 21 व्या मिनिटांस एस व्ही सुनील याचा मिळालेला पास तलविंदर याने अलगद गोलपोस्टमध्ये ढकलला; तर नंतर तलविंदर याने एक "हाय शॉट' यशस्वीपणे गोलमध्ये रुपांतरित केला. पाकिस्तानी खेळाडूंनी प्रतिआक्रमणे रचित भारतास सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय बचावफळी व गोलरक्षक दहिया यांनी दोन सुरेख "सेव्ह' भारतीय आघाडी सुरक्षित ठेवली. सामन्याचा दुसरा क्वार्टर संपण्यास अवघी मिनिटे शिल्लक असताना अमजद अली यानेही दोन "सेव्ह' करत पाकिस्तानचे आणखी नुकसान होण्यापासून वाचविले. मात्र पाकिस्तानी क्षेत्रातील भारतीय आक्रमणे सुरुच राहिली. सामन्याच्या मध्यंतरांपर्यंत भारताने पाकिस्तानवर 3-0 अशी आघाडी घेतली होती.

खेळ पुन्हा सुरु झाल्यानंतर मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा पुन्हा एकदा लाभ उठवित हरमनप्रीतने सामन्यातील दुसरा गोल केला. भारतीय आक्रमणे यशस्वी होत असताना पाकिस्तानी प्रतिआक्रमणे दहिया याने यशस्वीपणे परतवून लावली. पाकिस्तानला सलग दोनदा मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचाही फायदा उठविता आला नाही. हरमनप्रीत याने केलेल्या या गोलमुळे 3 ऱ्या क्वार्टरअखेर भारताची आघाडी 4-0 अशी होती. चौथ्या क्वार्टरमधील खेळ सुरु होताच आकाशदीप सिंग याने सरदार सिंग याने दिलेल्या उत्कृष्ट पासचा पुरेपुर फायदा उठवित भारतासाठी पाचवा गोल केला! याच्या अक्षरश: पुढच्या मिनिटास परदीप मोर याने आणखी एक गोल डागत ही आघाडी 6-0 अशी केली. भारताकडून गोल्सची अशी अक्षरश: वृष्टी होत असताना पाककडून करण्यात आलेल्या अगणित प्रयत्नांपैकी एक अंतिमत: यशस्वी ठरला. उमर भट्ट याने पाकिस्तानकडून हा गोल नोंदविला. मात्र सामना संपण्यास काही मिनिटे बाकी असतानाच आकाशदीप सिंग याने आणखी एक गोल करत पाकिस्तानच्या जखमांवर मीठ चोळले! यामुळे अंतिमत: भारताने पाकिस्तानला 7-1 अशा दणदणीत गोलफरकाने लोळविले.

तलविंदर, हरमनप्रीत व आकाशदीप यांनी या सामन्यात प्रत्येकी दोन गोल नोंदविले. या लीगच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना आता नेदरलॅंड्‌सशी होणार आहे.

Web Title: Hockey World League Semi-Final: India beat Pakistan 7-1