जगज्जेती सिंधू नव्या मोहिमेस सज्ज

वृत्तसंस्था
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

जागतिक विजेतेपद जिंकण्याचा इतिहास घडवल्यानंतर प्रथमच सिंधू चायना ओपन स्पर्धेच्या निमित्ताने कोर्टवर उतरणार आहे. दहा लाख डॉलर बक्षीस रकमेची ही स्पर्धा सिंधूसाठी ऑलिंपिक पूर्वतयारीच्या दृष्टीने मोलाची असेल.

चॅंगझोऊ : जागतिक विजेतेपद जिंकण्याचा इतिहास घडवल्यानंतर प्रथमच सिंधू चायना ओपन स्पर्धेच्या निमित्ताने कोर्टवर उतरणार आहे. दहा लाख डॉलर बक्षीस रकमेची ही स्पर्धा सिंधूसाठी ऑलिंपिक पूर्वतयारीच्या दृष्टीने मोलाची असेल.

जागतिक क्रमवारीत पाचव्या असलेल्या सिंधूने जागतिक विजेतेपदाचा दुष्काळ गेल्या महिन्यात संपवला. तिसऱ्यांदा तिने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. हे यश मिळवताना तिने महत्त्वाच्या स्पर्धेत कामगिरी उचावतो हेच दाखवले.

जागतिक स्पर्धेनंतर सिंधूचे अनेक कौतुक सोहळे झाले. आता त्यातून बाहेर पडून पूर्ण खेळावर लक्ष केंद्रीत करण्याची जबाबदारी तिच्यावर आहे. तिची चायना ओपनमध्ये सलामीला लढत माजी ऑलिंपिक, तसेच जागतिक विजेत्या ली झुएरुईविरुद्ध आहे.

पाच वर्षांपूर्वी चायना मास्टर्समध्ये ली झुएरुई हिला हरवून सिंधूने बॅडमिंटन जगताचे तिच्याकडे लक्ष वेधले होते. 2012 च्या त्या स्पर्धेच्यावेळी झुएरुई ऑलिंपिक विजेती होती. पाच वर्षांत सिंधूने खूपच प्रगती केली आहे, तर झुएरुईला दुखापतीने चांगलेच सतावले आहे. त्यामुळे झुएरुई जागतिक क्रमवारीत विसाव्या क्रमांकावर गेली आहे.

सिंधूने सलामीच्या लढतीतील प्रतिस्पर्धीविरुद्धच्या सहापैकी तीन लढती जिंकल्या आहेत. त्यात या वर्षीचा इंडोनेशियन मास्टर्समधील विजयही आहे. ही लढत जिंकल्यास सिंधूसमोर दुसऱ्या फेरीत कॅनडाची मिशेल ली असू शकेल, तर उपांत्यपूर्व फेरीत ऑल इंग्लंड विजेती चेन युफेई.

स्पर्धेत हेही महत्त्वाचे
- साईना नेहवालचा मार्ग खडतर आहे. तिची उपांत्यपूर्व फेरीत लढत ताई झु यींगविरुद्ध अपेक्षित.
- वर्षातील अखेरच्या सुपर एक हजार स्पर्धेद्वारे कॅरोलिन मरिन आणि व्हिक्‍टर ऍक्‍सेलसेनचे पुनरागमन.
- किदांबी श्रीकांत आणि एच एस प्रणॉयची माघार. श्रीकांत गुडघा दुखापतीने बेजार, तर प्रणॉयला डेंगू.
- जागतिक ब्रॉंझ विजेत्या बी साई प्रणीतकडे लक्ष.
- प्रणीतची दुसऱ्या फेरीत लढत तिसऱ्या मानांकित शि यु क्वीविरुद्ध अपेक्षित.
- थायलंड ओपन विजेत्या सात्विकसाईराज-चिराग शेट्टीचेही या स्पर्धेद्वारे पुनरागन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hope for china open championship from sindhu