शक्‍य तेवढे प्रयत्न करणार - राठोड

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 मे 2018

पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे ऑलिंपिकच्या तयारीवर काय परिणाम होते हे जाणून असलेले माजी ऑलिंपियन पदक विजेते नेमबाज आणि सध्याचे क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी "टोकियो 2020' ऑलिंपिकच्या तयारीसाठी सरकार शक्‍य तेवढे प्रयत्न करेल. कसलीही कसर ठेवणार नाही,' असा विश्‍वास भारतीय खेळाडूंना दिला. 
 

नवी दिल्ली - पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे ऑलिंपिकच्या तयारीवर काय परिणाम होते हे जाणून असलेले माजी ऑलिंपियन पदक विजेते नेमबाज आणि सध्याचे क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी "टोकियो 2020' ऑलिंपिकच्या तयारीसाठी सरकार शक्‍य तेवढे प्रयत्न करेल. कसलीही कसर ठेवणार नाही,' असा विश्‍वास भारतीय खेळाडूंना दिला. 

आपली भूमिका स्पष्ट करताना राठोड म्हणाले, ""टोकियो ऑलिंपिकसाठी आता अवघे दीड वर्ष बाकी राहिले आहे. आम्ही खेळाडूंच्या केवळ प्रशिक्षणावर नजत ठेवणार नाही, तर जर एखादा खेळाडू जखमी झाल्यास त्याचे झटपट पुनर्वसन कसे करता येईल यावरदेखील भर देणार आहोत.'' 

ऑलिंपिकमधील संभाव्या पदक विजेते शोधून त्यांना साह्य करण्यासाठी 2014 पासून "टॉप्स'ची योजना राबविली जात आहे. राठोड यांनी या योजनेचे समर्थन केले. ते म्हणाले, ""या योजनेअंतर्गत खेळाडूंना चांगली मदत मिळत आहे. मुख्य म्हणजे या योजनेतून केवळ आर्थिक साह्य हा हेतू नसून आम्ही त्यांच्या खेळात कशी सुधारणा घडवून आणता येईल, यासाठी विशेष संशोधन करतो. तुल्यबळ प्रतिस्पर्धींची नावे शोधून त्यांच्याविरुद्ध कसे खेळता येईल याविषयी त्यांना मार्गदर्शन करत आहोत. अशा गोष्टींमुळे खेळाडूंमध्ये एक प्रकारचा आत्मविश्‍वास वाढत आहे आणि त्याचा नक्कीच फायदा होईल.'' राठोड यांनी या वेळी भारतीय खेळाडूंच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले, ""राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीने भारतीय खेळाडूंना आपणही आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवू शकतो हे समजले. त्यांचा स्वतःवरील विश्‍वास वाढतो आहे. हा विश्‍वास कसा वाढीस लागेल हे पहायाचे काम आमचे आहे. त्यासाठी सरकारबरोबर, प्रशिक्षक आणि स्वतः खेळाडू प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे भारतात आता खेळासाठी पोषक असे पर्यावरण तयार होऊ लागले आहे.'' 

"टॉप्स' नियोजनाची कसोटी 

"टॉप्स' ही आमची बहुउद्देशीय योजना आहे. यातील खेळाडूंची निवड करण्यासाठी अधिकाअधिक व्यावसायिक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींची निवड आम्ही केली आहे. खेळाडूंची निवड करण्यापासून ते त्यांचा जागतिक दर्जा सिद्ध करण्यापर्यंतच्या प्रत्येक प्रयत्नांत आम्हाला व्यावसायिकता आणायची आहे. टोकियोसाठी आम्ही खेळाडूंची निवड केली आहे. त्यांच्या यशावर आमच्या "टॉप्स'चे फलित अवलंबून असल्याने आमच्या नियोजनाचीदेखील कसोटी लागणार आहे, असेही मत राठोड यांनी मांडले. 

Web Title: I will try as hard as possible says rathod