'बीसीसीआय' त्रिफळाचित 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

आयसीसीमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवणारी बैठक आजपासून दुबईत सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी प्रशासन आणि महसूल मॉडेल बैठकीत मांडण्यात आले. या दोन्ही मॉडेलना बीसीसीआयचा पहिल्यापासून विरोध होता.

नवी दिल्ली - शशांक मनोहर कार्याध्यक्ष असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीत एकटे पडलेल्या बीसीसीआयचा दोन मुद्यांवर दारुण पराभव झाला. आयसीसीने तयार केलेल्या प्रशासनाच्या आणि आर्थिक वाटा हिस्साच्या नव्या मॉडेलला विरोध करताना बीसीसीआय एकटे पडले. 

आयसीसीमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवणारी बैठक आजपासून दुबईत सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी प्रशासन आणि महसूल मॉडेल बैठकीत मांडण्यात आले. या दोन्ही मॉडेलना बीसीसीआयचा पहिल्यापासून विरोध होता. त्यामुळे घेण्यात आलेल्या मतदानात भारताचा प्रशासन बदलामध्ये 1-9; तर महसूल मॉडेलमध्ये 2-8 असा पराभव झाला. केवळ श्रीलंकेने भारताच्या बाजूने मतदान केले. 

या बैठकीसाठी "बीसीसीआय'चे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्याने या वृत्तास दुजोरा दिला. आयसीसी करत असलेले हे दोन्ही बदल स्वागतार्ह नाहीत, आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत या सर्व मुद्यांवर आम्ही चर्चा करणार आहोत, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले. 

एन. श्रीनिवासन "आयसीसी'चे अध्यक्ष असताना त्यांनी "ब्रीग थ्री' (भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया मंडळ) मॉडेल तयार केले होते. या तिन्ही मंडळांकडून आयसीसीला अधिक उत्पन्न मिळत असल्याने त्यांना महसूल विभागणीत मोठा हिस्सा मिळत होता; परंतु मनोहर यांनी आयसीसीची सूत्रे स्वीकारल्यानंतर "बी थ्री' मॉडेल रद्द करण्यावर भर दिला. बीसीसीआयचे आर्थिक नुकसान होणार असल्यामुळे पहिल्यापासून त्यांचा विरोध होता. अगोदरच्या रचनेनुसार बीसीसीआयला 57 कोटी डॉलर मिळायचे; परंतु नव्या रचनेनुसार 29 कोटी डॉलर मिळणार आहेत. मनोहर यांनी आणखी 10 कोटी डॉलरची वाढ देण्याचा प्रस्ताव काल "बीसीसीआय'ला दिला होता; परंतु त्यांनी तो लगेचच नाकारला होता. 

मनोहर यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या नव्या मॉडेलना आम्ही करत असलेल्या विरोधाला विरोध होणार हे अपेक्षित होते. झिंबाब्वे आणि बांगलादेश आमच्या बाजूने असतील असे वाटत होते, परंतु त्यांनी ऐनवेळी आम्हाला विरोध केला, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले. भारतीय क्रिकेट मंडळाच्या कारभाराची सूत्रे सध्या सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासन समितीकडे आहे. आयसीसीमध्ये झालेला हा पराभव त्यांच्यासाठीही मानहानिकारक आहे, असे बोलले जात आहे. या मुद्यावर आपल्याला इतर देशांचा पाठिंबा मिळावा, यासाठी नमाझुल हसन पपॉन, डेव्हिड पीवर, हरुन लॉर्गट यांच्याशी चर्चा केली होती, परंतु प्रशासन समितीच्या सदस्यांना या परदेशी पदाधिकाऱ्यांच्या मनाचा ठावठिकाणा लागला नाही, अशी खंतही या पदाधिकाऱ्याने व्यक्त केली. 

मनोहर यांच्या भूमिकेने धक्का 
बीसीसीआयचे हीत जपण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत होतो, परंतु याच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष असलेल्या मनोहर यांच्या बीसीसीआय विरोधातील भूमिकेचा आम्हाला धक्का बसला, असा उल्लेख या पदाधिकाऱ्याने केला. नव्या रचनेनुसार वाट्यास येणारे 29 कोटी डॉलर घ्या नाही तर सोडून द्या, असेही मनोहर म्हणाल्याचे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. 

Web Title: ICC meet: BCCI loses revenue, governance votes as Manohar plays hardball