New zealand vs pakistanन्यूझीलंडसाठी पाक धोकादायक

टी-२० विश्वकरंडक ; उपांत्य सामन्यात दोन्ही संघांची गोलंदाजी ताकदवान
New zealand vs pakistan
New zealand vs pakistansakal

सिडनी : आयसीसीच्या जवळपास गेल्या प्रत्येक स्पर्धांत सातत्यपूर्ण कामगिरी करून उपांत्य फेरी गाठणाऱ्या न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध उपांत्य सामन्यात मात्र कधीच जिंकलेला नाही, त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या या उपांत्य लढतीबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.

मायदेशी जायच्या विमानात बसू बघणारा पाकिस्तानचा संघ ध्यानी मनी स्वप्नी नसताना सिडनीला जायच्या विमानात बसला. दक्षिण आफ्रिकन संघाने नेदरलँडसविरुद्ध हार पत्करली आणि पाकला लॉटरी लागली. ‘क्रिकेट सामन्यामध्ये काहीही होऊ शकते हे आता नुसते चघळायचे वाक्य राहिले नसून पाकिस्तानसाठी तारणहार ठरणारे वाक्य बनले आहे’, पाक संघाचा प्रशिक्षक मॅथ्यू हेडन हसत हसत सांगून गेला.

पाक संघ अत्यंत अनपेक्षितपणे उपांत्य फेरीत पोहोचला असला, तरी १९९२, १९९९ मुख्य वर्ल्ड कप आणि २००७ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत याच संघाने न्यूझीलंडला पराभवाचे धक्के दिलेले आहेत. कागदावर दोन्ही संघ समान ताकदीचे भासत आहेत. वेगवान गोलंदाजांचा ताफा दोनही बाजूला आहे. दोन्ही संघांचे मुख्य अस्त्र डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. फरक इतकाच आहे, की शाहीन शाह आफ्रिदी तेज आहे आणि ट्रेंट बोल्ट स्विंगचा सुलतान आहे.

न्यूझीलंड संघाच्या यशाचे रहस्य जसे भरवशाच्या केन विल्यमसन, डेवॉन कॉन्वेवर अवलंबून आहे, तसेच ते फिन अ‍ॅलन आणि ग्लेन फिलिप्स या अत्यंत आक्रमक फलंदाजांतही दडले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या विजयाप्रमाणे पाकिस्तानच्या वेगवान माऱ्या‍ला फिन अ‍ॅलन शिंगावर घेतो का हे बघायला मजा येणार आहे.

आम्ही साखळी स्पर्धेत चांगली कामगिरी करून पुढे येत असल्याने आमचे सातत्य दिसून येत असले तरी आता आम्हाला उपांत्य आणि अंतिम सामन्याचा अडथळा पार करायची प्रामाणिक इच्छा आहे’ केन विल्यमसन म्हणाला.सामन्याच्या आदल्या दिवशी पाक संघ सराव करायला आला नसताना कप्तान बाबर आझमने ४० मिनिटे फलंदाजीचा मन लावून सराव केला. साखळी स्पर्धेत चांगली कामगिरी करता न आल्याने बाबर आझम निर्णायक सामन्यात सर्वोत्तम खेळी करण्याचे सर्व ते प्रयत्न करतो आहे.

पाक संघाचा उपकप्तान शादाब खान खूप चांगल्या लयीत आहे. सुंदर गोलंदाजीबरोबर आक्रमक फलंदाजीत फटकेबाजी शादाब करत आहे. अगोदर संघात नसलेला आणि दुसऱ्या खेळाडूच्या दुखापतीने अचानक संधी मिळालेला २१ वर्षी हॅरिस जोरकस फटकेबाजी करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

ठणठणीत खेळपट्टी

गेल्या काही दिवसांत सिडनीला भरपूर ऊन पडत असल्याने खेळपट्टी तयार करायला वेळ मिळाला आहे. उपांत्य सामन्याकरिता तयार केलेली खेळपट्टी अगोदरच्या सामन्यात वापरलेली नाही असे कर्मचाऱ्यां‍नी सांगितले. याचाच अर्थ विकेटच्या ताजेपणाचा फायदा घ्यायला नाणेफेक जिंकणारा कप्तान पहिली गोलंदाजी करणे पसंत करेल.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com