esakal | T20 World Cup साठी ICC उधळणार BCCI चा IPL प्लॅन?
sakal

बोलून बातमी शोधा

IPL VS T20 World Cup

T20 World Cup साठी ICC उधळणार BCCI चा IPL गेम प्लॅन?

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) च्या 14 व्या हंगामातील उर्वरित सामने युएईच्या मैदानात रंगणार आहेत. 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान बीसीसीआयने सामने खेळवण्याचा प्लॅन आखल्याचे वृत्त चर्चेचा विषय ठरत आहे. यात आता आणखी एक ट्विस्ट निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला बीसीसीआयचा हा प्लॅन मान्य नसल्याचे वृत्त आहे.

आगामी आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा 18 ऑक्टोबरपासून घेण्याची तयारी आयसीसीकडून केली जात आहे. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा 10 तारखेपर्यंत आटोपून घ्यावी, असे आयसीसीला वाटते. आयपीएल स्पर्धेनंतर अवघ्या 3 दिवसांत वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली तर याचा जागतिक स्पर्धेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच बीसीसीआयच्या युएईतील गेम प्लॅनवर आयसीसीने आक्षेप नोंदवला आहे.

हेही वाचा: चहल-धनश्रीचा वर्कआउट; नेटकऱ्यांनी दिल्या मजेदार कमेंट्स

इनसाइड स्पोर्ट्सने आयसीसीच्या सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, 'टी20 वर्ल्ड कप 18 ऑक्टोबरपासून सुरु होईल. या परिस्थितीत आयपीएल स्पर्धा 15 ऑक्टोबरपर्यंत खेळवणे शक्य नाही. आयसीसी याला परवानगी देणार नाही. टी-20 वर्ल्ड कपमधील संघ आपल्या खेळाडूंना आयपीएल स्पर्धेत खेळायला परवानगी कशी देतील? असा प्रश्न उपस्थिती करण्यात येत आहे. आयपीएल स्पर्धा 10 ऑक्टोबरपर्यंत उरकून घ्यावी, असा पर्याय आयसीसी बीसीसीआयला देऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आयसीसीने मागील वर्षीच वर्ल्ड कपसंदर्भात घोषणा केली होती. ऑक्टोबरच्या मध्यांत स्पर्धेला सुरुवात होईल आणि 14 नोव्हेंबरला फायनल सामना खेळवण्यात येईल, असे आयसीसीने जाहीर केले होते.

बीसीसीआयच्या प्लॅनवर आयसीसीने नाराजी व्यक्त केल्यामुळे आयपीएलच्या आयोजनाच्या नियोजन पुन्हा एकदा गोंधळण्याचे संकेत मिळत आहेत. आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात अखेर माघार कोण घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अधिकृतरित्या यासंदर्भातील भूमिका अद्याप समोर आलेली नसली तरी वर्ल्ड कप स आणि आयपीएलच्या मुद्यावरुन सध्या आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात पडद्यामागे सामना रंगल्याचे चित्र पाहायला मिळते. आयसीसी आपल्या मतावर ठाम राहणार की बीसीसीआय त्यांचे मन वळवण्यात यशस्वी होणार हे पाहावे लागेल.

हेही वाचा: INDvsSL भारताचा संभाव्य संघ;अय्यर-धवनमध्ये कॅप्टन्सीचा सामना

जर आयसीसीने अधिकृतरित्या बीसीसीआयला 10 ऑक्टोबरपर्यंत स्पर्धा उरकण्याची सूचना केली तर बीसीसीआयच्या अडचणी वाढणार आहेत. उर्वरित सामन्यांसाठी 25 दिवसांची विंडो हवी, असे बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. दुसरीकडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या ठिकाणाविषयी देखील संभ्रम आहे. या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भात चित्र स्पष्ट होईल असे वाटते.