
ICC Womens ODI Ranking : दीप्तीची घसरण; मिताली-स्मृती जैसे थे!
महिला वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आयसीसीने (ICC) ताजी महिला वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. बॅटरच्या यादीत भारतीय संघाची कर्णधार मिताली राज (Mithali Raj) दुसऱ्या स्थानावर असून स्मृती मानधना (Smriti Mandhana) आठव्या स्थानावर आहे. टॉप 10 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा दिसून येतो. पहिल्या स्थानावर असलेल्या एलिसा हिलीसह पाच जणींचा टॉप टेनमध्ये समावेश आहे.
ऑस्ट्रेलियन बॅटर एलिसा हिली 749 रेटिंग पाँइंट्ससह अव्वलस्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ या यादीत मिताली राजचा नंबर लागतो. मितालीच्या खात्यात 735 रेटिंग पाँइंट्स जमा आहेत. इंग्लंडची बॅटर टॅमी ब्यूमोंट 707 रेटिंग पाँइंट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ मेग लेनिंग (706), बेथ मूनी (705), लेझी ली (702) या एका स्थानाच्या सुधारणेसह अनुक्रमे चौथ्या पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर पोहचल्या आहेत. ऑस्ट्रेलियन एमी सॅटरथवेट हिची चार स्थानांनी घसरण झाली असून ती 700 रेटिंग पाँइंट्सह सातव्या स्थानावर आहे. भारताची स्मृती मानधना (666), एलिसे पेरी (661) आणि ल्युरा (661) रेटिंगसह जैसे थे आहेत.
अष्टपैलू महिला खेळाडूंच्या यादीत एलिसा पेरी अव्वलस्थानावर आहेत. तिने 438 रेटिंगची कमाई केली आहे. या यादीत दीप्ती शर्मा हीची घसरण झाली आहे. एका स्थानाच्या फटक्यासह ती 309 रेटिंग पाँइंट्सह पाचव्या स्थानावर आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत मिताली राजला अव्वलस्थानी झेप घेण्याची संधी असेल. याशिवाय दीप्ती आणि स्मृती मानधनालाही आपल्या स्थानात सुधारणा करण्याची संधी असेल.