भारत-पाक क्रिकेटची आयसीसीला चिंता

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

कोलकाता  - भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय क्रिकेटची चिंता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) लागून राहिली आहे. या दोन्ही देशांमधील संबंध गुंतागुंतीचे असल्याचे मत आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्ह रिचर्डसन यांनी व्यक्त केली. येथे झालेल्या पाच दिवसांच्या आयसीसीच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

कोलकाता  - भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय क्रिकेटची चिंता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) लागून राहिली आहे. या दोन्ही देशांमधील संबंध गुंतागुंतीचे असल्याचे मत आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्ह रिचर्डसन यांनी व्यक्त केली. येथे झालेल्या पाच दिवसांच्या आयसीसीच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

विविध विषयांवर पाच दिवस ऊहापोह केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रिचर्डसन यांनी भारत-पाक क्रिकेट संबंधांवर भाष्य केले. भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय क्रिकेट सुरू व्हावे, अशी क्रिकेट जगताची इच्छा आहे; पण हे फार गुंतागुंतीचे आहे, याची आम्हाला चिंता आहे. दोन्ही मंडळांनी तयारी दर्शविल्याशिवाय हे शक्‍य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

२०१४ मध्ये स्वाक्षरी केलेला द्विपक्षीय क्रिकेट खेळण्याचा करार बीसीसीआयने मोडला असल्याचा कांगावा पाकिस्तान मंडळाकडून करण्यात येत आहे. २०१५ ते २०२३ या दरम्यान सहा मालिका होणे अपेक्षित होते, असा पाक मंडळाचा दावा आहे. हा करार मोडल्यामुळे पाकने बीसीसीआयवर ७ कोटी डॉलरच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. याची सुनावणी ऑक्‍टोबरमध्ये होणार आहे. 

एकमेकांबरोबर खेळण्याची ती इच्छा होती, कोणताही करार नव्हता. त्या पत्रावर चिटकून राहिल्याबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही; पण तो करार नव्हता हे पाक मंडळाने लक्षात ठेवावे, असे बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी म्हटले आहे. पाक मंडळाकडून त्यांच्यावर दडपण टाकले जाणे स्वाभाविक आहे. ९ एप्रिल २०१४ चे ते पत्र बीसीसीआयचे तत्कालीन सचिव संजय पटेल यांनी पाक मंडळाचे कार्याध्यक्ष नजम सेठी यांना लिहिले होते, अशी माहिती चौधरी यांनी दिली.

सर्वांना टी-२० दर्जा
ट्‌वेन्टी-२० क्रिकेटची व्याप्ती वाढवण्यासाठी आयसीसीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सलग्न असलेल्या सर्व १०४ देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यांना टी-२०चा अधिकृत दर्जा दिला आहे. जानेवारी २०१९ पासून याची अंमलबजावणी होईल. असाच दर्जा महिलांच्याही सर्व ट्‌वेन्टी-२० सामन्यांना देण्यात आला आहे. त्याची सुरवात दोन महिन्यांनंतर म्हणजेच जुलै २०१८ पासून होईल.

गैरवर्तनाला माफी नाही
क्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ असून, गैरवर्तन करणाऱ्यांना कठोर शासन करण्यावर आयसीसी ठाम राहिली आहे. चेंडू कुरतडणे, मैदानावर शिवीगाळ करणे, पंचांच्या निर्णयाचा अनादर करणे अशा प्रकारचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. क्रिकेटची शिस्त बिघडवणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचाही निर्णय आयसीसीच्या या बैठकीत घेण्यात आला.

कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेला मान्यता
२०१९ ते २०२३ मधील स्पर्धा, सामन्यांच्या कार्यक्रमाला (एफटीपी) मान्यता देण्यात आली. त्यानुसार कसोटी क्रिकेटचे अजिंक्‍यपद स्पर्धा होणार आहे; तसेच २०२१ मधील चॅंपियन्स करंडक रद्द करण्यात आली असून, त्याऐवजी जागतिक ट्‌वेन्टी-२० स्पर्धा होणार आहे.

क्रिकेटचा ऑलिंपिकमध्ये समावेश व्हावा यासाठी आम्ही आग्रही आहोत. पण, २०२४ ऑलिंपिकसाठी नव्या खेळांच्या समावेशाचा प्रस्ताव पाठविण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे आता २०२८ ऑलिंपिकसाठी आम्ही हा प्रयत्न करू आणि त्या वेळी क्रिकेटचा ऑलिंपिकमध्ये समावेश होईल अशी आम्हाला आशा आहे.
- डेव्ह रिचर्डसन, आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: ICCC concern of Indo-Pak cricket