IND vs AUS : तो एकटा नडला अन् मित्राची इज्जत वाचवली! टीम इंडियाचा कांगारूवर दणदणीत विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS 1st odi India win by five wickets KL Rahul and Ravindra Jadeja Mohammed Shami and Siraj

IND vs AUS : तो एकटा नडला अन् मित्राची इज्जत वाचवली! टीम इंडियाचा कांगारूवर दणदणीत विजय

IND vs AUS 1st ODI India WIN : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तीन वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला चांगलीच पराभवाची धूळ चारली. भारताने कांगारूचा 5 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने भारताला 189 धावांचे लक्ष्य दिले होते, जे टीम इंडियाने 5 विकेट्स गमावून पूर्ण केले. केएल राहुल भारताच्या विजयाचा हिरो ठरला. राहुलने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शानदार अर्धशतक ठोकले.

189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. 39 धावांनी भारताने आपले आघाडीचे चार फलंदाज गमावले होते. ईशान किशन तीन धावा, शुभमन गिल 20 धावा, विराट कोहली चार धावा आणि सूर्यकुमार यादव खाते न उघडताच बाद झाले. मिचेल स्टार्कने पहिल्या चारपैकी तीन विकेट घेतल्या. त्याचवेळी स्टॉइनिसने ईशानशिवाय हार्दिक पांड्याला बाद केले. हार्दिक पांड्या च्या नेतृत्वाखाली भारत कुठेतरी पराभवाच्या छत्रछायेत दिसत होता. मात्र केएल राहुल एकटा नडला आणि मित्राची इज्जत वाचवली.

केएल राहुलने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने रवींद्र जडेजासोबत सहाव्या विकेटसाठी 100 हून अधिक धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. केएल राहुलने आपले सातवे एकदिवसीय अर्धशतक झळकावले. रवींद्र जडेजानेही 69 चेंडूत 45 धावांची खेळी केली. त्याने चांगली गोलंदाजीही केली. जडेजाने 9 षटकात 46 धावा देत 2 विकेट घेतल्या. त्याचवेळी एक जबरदस्त झेलही पकडला गेला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत राहुलने उपकर्णधारपद गमावले. नंतर त्याला संघातूनही वगळण्यात आले. यापूर्वी टी-20 मध्येही त्याच्यासोबत असेच घडले होते. पण, राहुलने मुंबई एकदिवसीय सामन्यात आपली क्षमता सिद्ध केली आणि कठीण काळात मॅच विनिंग इनिंग खेळली.

तत्पूर्वी, तत्पूर्वी, हार्दिक पांड्याने एकदिवसीय कर्णधारपदाच्या पदार्पणात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खुपच खराब झाली. चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया कडून दमदार फलंदाजी करणारा ट्रॅव्हिस हेड फक्त पाच धावा करून बाद झाला. यानंतर मिचेल मार्श आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली.

मात्र हार्दिक पांड्याने स्मिथला आउट करत कांगारूला मोठा धक्का दिला. तिसऱ्या विकेटसाठी मार्शने लबुशेनसोबत मार्शने 52 धावांची भागीदारी केली. जडेजाने त्याला 81 धावावर बाद केले. त्याने या दरम्यान 65 चेंडूत 10 चौकार आणि पाच षटकार मारले.

मिचेल मार्श बाद झाल्यानंतर संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ कोसळला.मोहम्मद शमीने तीन षटकांत तीन विकेट घेतल्या. त्यानंतर जडेजाने मॅक्सवेलला झेलबाद केले. मॅक्सवेलला आठ धावा करता आल्या. शेवड़टी सिराजने शॉन अॅबॉट आणि अॅडम झम्पा यांना बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव 188 धावांत गुंडाळला. शमी आणि सिराजने प्रत्येकी तीन, तर जडेजाने दोन विकेट घेतल्या. हार्दिक आणि कुलदीपने प्रत्येकी एक विकेट घेतली.