
IND vs AUS Playing 11: आता ODI मालिकेचा थरार! कर्णधार हार्दिक पांड्या या खेळाडूंना देणार डच्चू
India vs Australia 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपताच, एकदिवसीय मालिकेचा थरार आता रंगणार आहे. पहिला सामना 17 मार्चला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे खेळणार नाही. अशा परिस्थितीत स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या टीम इंडियाची जबाबदारी सांभाळणार आहे.
टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडू शकतो, त्यानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचे चित्र पूर्णपणे बदलेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताची कोणती प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरणार यावर एक नजर टाकूया.
टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत खेळणार नाही. अशा स्थितीत पहिल्या वनडेत शुभमन गिल इशान किशनसोबत सलामीला करेल. ईशान किशन आणि शुभमन गिल ही जोडी अतिशय धोकादायक आहे आणि हे दोन्ही फलंदाज पॉवर प्लेमध्ये जबरदस्त धावा लुटण्यात पटाईत आहेत.
इशान किशन आणि शुभमन गिल यांनी वनडेमध्ये 1-1 वेळा द्विशतके झळकावली आहेत. ईशान किशन सामन्याला क्षणार्धात कलाटणी देण्यात माहीर आहे. ईशान किशननेही टीम इंडियाला विकेटकीपिंगचा पर्याय दिला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. विराट कोहलीने भारतासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये आता सध्या शतके झळकावली आहेत.
श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर असू शकतो. अशा स्थितीत भारतीय संघ व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करून सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून संधी देऊ शकते. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या केएल राहुलला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संधी देऊ शकते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर अष्टपैलू म्हणून फलंदाजी करेल. रवींद्र जडेजाला 7 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देईल. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर फिरकी गोलंदाजीसह फलंदाजीत टीम इंडियाला मजबूत करतील. त्यामुळे युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादवला पहिल्या एकदिवसीय सामन्यात बेंच वर बसावे लागेल. वेगवान गोलंदाजामध्ये मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना संधी दिल्या जाईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट