
IND vs AUS : रोहितची एन्ट्री होताच दुसऱ्या वनडेतून 'या' दिग्गज खेळाडूचा पत्ता कट
India vs Australia 1st ODI : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला विजयाने सुरुवात केली आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेला. या सामन्यात टीम इंडियाचा एक खेळाडू पूर्णपणे फ्लॉप ठरला. अशा परिस्थितीत या खेळाडूला आगामी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणे कठीण झाले आहे.
या सामन्यात रोहित शर्माच्या जागी अष्टपैलू हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत होता. हार्दिक पांड्याने या सामन्याच्या प्लेइंग 11 मध्ये ईशान किशन आणि शुभमन गिलचा सलामीवीर म्हणून समावेश केला होता. मात्र या संधीचा फायदा उठवण्यात ईशान किशन अपयशी ठरला आणि स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. आगामी सामन्यात त्याला बाहेर बसावे लागू शकते.
इशान किशनने पहिल्या एकदिवसीय सामन्यात केवळ 8 चेंडूंचा सामना केला आणि 3 धावा केल्यानंतर त्याची विकेट गमावली. त्याचवेळी दोन्ही संघांमधील मालिकेतील पुढील सामना 19 मार्चला खेळल्या जाणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा संघाचे कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे.
रोहित शर्मा सलामीवीर म्हणून खेळतो, अशा स्थितीत इशान किशनला दुसऱ्या सामन्यातून वगळले जाऊ शकते. रोहित शर्मासह शुभमन गिल डावाची सुरुवात करणारा सर्वात मोठा दावेदार आहे.
या सामन्यात टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी शानदार गोलंदाजी करत प्रत्येकी तीन विकेट घेत ऑस्ट्रेलियाला पहिल्या एकदिवसीय सामन्यात 35.4 षटकात 188 धावांत गुंडाळले.
प्रत्युत्तर देताना भारताची सुरुवातही अत्यंत खराब झाली. यानंतर राहुल (नाबाद 75) आणि रवींद्र जडेजा (नाबाद 45) यांनी सहाव्या विकेटसाठी 108 धावांची अखंड भागीदारी करत संघाला 39.5 षटकांत 5 बाद 191 धावांपर्यंत नेले आणि विजय मिळवून दिला.