IND vs AUS: रोहितच्या पुनरागमनामुळे बळकटी! गुढीपाडव्याअगोदरच मालिका विजेतेपदाची गुढी उभारण्याची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Australia 2nd ODI Match :

IND vs AUS: रोहितच्या पुनरागमनामुळे बळकटी! गुढीपाडव्याअगोदरच मालिका विजेतेपदाची गुढी उभारण्याची संधी

India vs Australia 2nd ODI Match : केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर मुंबईत पहिल्या विजयाचे निशाण रोवणाऱ्या भारताला आता गुढीपाडव्याअगोदरच मालिका विजेतेपदाची गुढी उभारण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दुसरा सामना आज होत असून या सामन्यातही बाजी मारली तर मालिकाही जिंकण्याची संधी मिळणार आहे.

वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी झालेला पहिला सामना भारतीयांच्या क्षमतेची कसोटी पाहणारा होता. अगोदर गोलंदाजांनी कमाल केली, त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव १८८ धावांपर्यंत मर्यादित ठेवता आला. त्यानंतर मिशेल स्टार्कच्या दणक्यासमोर फलंदाजांची दाणादाण उडाल्यानंतर केएल राहुल आणि जडेजा मदतीला धावून आले.

हा सामना जिंकला असला तरी भारतीय संघाच्या काही कमकुवत बाजू समोर आल्या होत्या. उर्वरित दोन सामन्यांसाठी रोहित शर्मा उपलब्ध होणार असल्यामुळे फलंदाजीस बळकटी मिळणार आहे. शिवाय कर्णधार म्हणून रोहितचा अनुभवही मोलाची ठरणार आहे.

पहिल्या सामन्यात शॉन मार्शच्या तडाख्यामुळे संघ अडचणीत असताना हार्दिक पंड्याने डगमगून न जाता गोलंदाजीत अचुक बदल केले आणि त्याचा योग्य परिणाम दिसून आला होता. उरलेल्या दोन सामन्यांत रोहित कर्णधार असेल तर हार्दिक उपकर्णधार. परिणामी रणनीती तयार करण्यात किंवा परिस्थितीनुसार बदलण्यात ठोसपणा असेल.

रोहितच्या संघात परतत असल्यामुळे सलामीचा प्रश्न सुटणार आहे. बांगलादेशविरुद्ध विक्रम द्विशतक केल्यानंतर ईशान किशनला प्रभाव पाडता आलेला नाही. कालच्या पहिल्या सामन्यात तर स्टार्क आणि स्टॉयनिससमोर त्याची तारांबळ उडत होती आणि त्याची विकेट लवकर गेल्यानंतर गळती सुरू झाली होती. उद्या रोहित आणि गिल असे भक्कम सलामीवीर असतील.

सूर्या कधी तळपणार?

सूर्यकुमार यादव भले ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज असेल, परंतु एकदिवसीय सामन्यात त्याला सातत्य दाखवता आलेले नाही. संधी मिळालेल्या सामन्यात तो अपयशी ठरलेला आहे. वानखेडेवरील सामन्यात तर त्याला भोपळाही फोडता आला नव्हता, परंतु संघ अडचणीत आला होता. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्यामुळे खेळायची संधी मिळाली आहे. विश्वकरंडक स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झालेले असताना सूर्यकुमारकडून तळपण्याची वेळ आली आहे.

मिशेल मार्शचा धोका

मुळात अष्टपैलू गुणवत्ता असलेला मिशेल मार्श प्रथमच सलामीला खेळला आणि त्याने आपली आक्रमक क्षमता पहिल्या सामन्यात दाखवून दिली. या सामन्यात तो बाद होईपर्यंत ऑस्ट्रेलियाकडून १६ चौकार आणि पाच षटकार मारण्यात आले होते, त्यात मार्शचा वाटा १० चौकार आणि पाच षटकारांचा होता. उद्याही तो तशीच खेळी खेळण्याचा प्रयत्न करेल. मार्श बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोसळली होती.

त्यात कर्णधार स्टीव स्मिथ, कॅमेरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल अपयशी ठरले होते. उद्याच्या सामन्यात ते चुका निश्चितच टाळतील यासाठी डावाच्या मध्यावर शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना वेगळा विचार करून गोलंदाजी करावी लागणार आहे. मोहम्मद शमी आणि सिराज यांना सापडलेला सूर भारतीय गोलंदाजीचा आत्मविश्वास वाढवणारा आहे.

संघ यातून निवडणार ः रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ईशान किशन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट

ऑस्ट्रेलिया ः डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, स्टीव स्मिथ (कर्णधार), मार्नस लबुशेन, मिशेल मार्श, मार्कस स्टॉयनिस, अलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, जॉस इग्लिस, सिन ॲबॉट, ॲश्टन ॲगर, मिशेल स्टार्क नॅथन एलिस आणि ॲडम झॅम्पा.