IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाची झुंजार फलंदाजी; दिवसअखेर घेतली 62 धावांची आघाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS 2nd Test LIVE

IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाची झुंजार फलंदाजी; दिवसअखेर घेतली 62 धावांची आघाडी

IND vs AUS 2nd Test Day-2 LIVE : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा दुसला दिवस सुरू झाला त्यावेळी नॅथन लयॉनने भारतीय फलंदाजीला भगदाड पाडण्यास सुरूवात केली. कांगारूंच्या फिरकीपुढे भारताची अवस्था 7 बाद 139 अशी झाली. कांगारूंना सामना आपल्या हातात आल्यासारखे वाटले. मात्र कांगारूंसाठी हे मृगजळ ठरले.

कारण भारताची फलंदाजी ही हनुमानाच्या शेपटीसारखी आहे संपतच नाही! भारताचे 7 फलंदाज तंबूत गेले असताना अक्षर पटेल आणि अश्विन यांनी आठव्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाचा मोठी आघाडी घेण्याचा मनसुबा उधळून लावला. भारताने पहिल्या डावात 262 धावा केल्या. यात अक्षर पटेलच्या 74 धावांचे मोलाचे योगदान होते. अश्विनने 37 तर विराट कोहलीने 44 धावांचे योगदान दिले.

ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात अवघ्या 1 धावेची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर उस्मान ख्वाजा ला जडेजाने 6 धावांवर बाद केले. मात्र त्यानंतर वॉर्नरच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या ट्रॅव्हिस हेडने नाबाद 39 धावा केल्या. त्याला मार्नस लाबुशानेने नाबाद 16 धावा करत चांगली साथ दिली. दुसरा दिवस संपला त्यावेळी कांगारूंनी 1 बाद 61 धावा करत 62 धावांची आघाडी घेतली.

तत्पूर्वी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या दिल्ली कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या दिवशी 263 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 81 धावांची खेळी केली. त्याचवेळी पीटर हँड्सकॉम्बने नाबाद 72 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याचवेळी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने 3-3 विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाकडे 62 धावांची आघाडी 

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दमदार सुरूवात केली. सलामीवीर ख्वाजा स्वस्तात माघारी गेल्यानंतरही ट्रॅव्हिस हेडने 39 धावांची नाबाद खेळी करत ऑस्ट्रेलियाला दिवस अखेर 1 बाद 61 धावांपर्यंत पोहचवले.

23-1 : जडेजाने कांगारूंना दिला पहिला धक्का

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावत बिनबाद 23 धावा करत चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र रविंद्र जडेजाने पहिल्या डावात 81 धावा करणाऱ्या उस्मान ख्वाजाला 6 धावांवर बाद केले. लेग स्लिपमध्ये उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरने अफलातून झेल पकडला.

259-9 : कांगारूंनी भारताला दिले पाठोपाठ दोन धक्के

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने भारताची 114 धावांची शतकी भागीदारी करणारी जोडी फोडली. त्याने अश्विनला 37 धावांवर बाद केले. त्यानंतर लगेचच टॉड मर्फीने 74 धावा करणाऱ्या अक्षर पटेलला बाद करत भारताला मोठा धक्का दिला.

230-7 (75.3 Ov) : अक्षर पेटलचे दमदार अर्धशतक

चहापानानंतर अक्षर पेटल आणि अश्विनने आपली बहुमूल्य भागीदारी अजून वाढवत भारताला 200 च्या पार पोहचवले. दरम्यान अक्षर पटेलने कसोटी क्रिकेटमधील आपले दुसरे अर्धशतक ठोकले.

अक्षर पटेलची आक्रमक फलंदाजी 

भारताची पहिल्या डावात 7 बाद 139 धावा अशी अवस्था झाली होती. भारत अजूनही पहिल्या डावात 100 धावांनी पिछाडीवर होता. मात्र त्यानंतर अक्षर पटेलनेआक्रमक फलंदाजी करत ही पिछाडी झपाट्याने भरून काढण्याचा प्रयत्न केला. अश्विन आणि पटेल या जोडीने भारताला टी टाईमपर्यंत 179 धावांपर्यंत पोहचवले. भारत आता 84 धावांनी पिछाडीवर आहे.

भारताची सातवी विकेट पडली

139 धावांच्या स्कोअरवर भारताची सातवी विकेट पडली आहे. श्रीकर भरत 12 चेंडूत सहा धावा करून बाद झाला आहे. नॅथन लायनने त्याला झेलबाद केले.

दिल्ली कसोटीत कांगारूने टीम इंडियाचं कंबरडे मोडले! विराट कोहलीही आऊट

दिल्ली कसोटीत कांगारूने टीम इंडियाचं कंबरडे मोडले आहे.135 धावांच्या स्कोअरवर भारताची सहावी विकेट पडली. विराट कोहली 84 चेंडूत 44 धावा करून बाद झाला आहे.

भारताची पाचवी विकेट पडली

भारताचा निम्मा संघ 125 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. रवींद्र जडेजा 74 चेंडूत 26 धावा करून आऊट झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. जडेजा आणि कोहलीने 59 धावांची भागीदारी केली.

दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्राचा खेळ संपला

दिल्ली कसोटीत दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्राचा खेळ आटोपला आहे. लंचपर्यंत भारताची धावसंख्या 88/4 आहे. विराट कोहली 14 आणि रवींद्र जडेजा 15 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्कोअरपेक्षा भारत अजूनही 175 धावांनी मागे आहे.

IND vs AUS 2nd Test LIVE: नॅथन लायनचा राजधानीत कहर! टीम इंडियाला चौथा धक्का

भारताला 66 धावांच्या स्कोअरवर चौथा धक्का बसला आहे. श्रेयस अय्यरने 15 चेंडूत चार धावा केल्या. नॅथन लियॉनच्या फिरकीत अडकल्याने टीम इंडिया अडचणीत आली आहे. 27 षटकांनंतर भारताची धावसंख्या 4 बाद 67 अशी आहे.

100व्या कसोटीत पुजारा शून्यावर आऊट! टीम इंडिया तिसरा धक्का

54 धावांवर भारताची तिसरी विकेट पडली आहे. चेतेश्वर पुजाराला आपल्या 100व्या कसोटीतील पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही. नॅथन लायनने एकाच षटकात दोन विकेट घेत टीम इंडियाला बॅकफूटवर आणले आहे.

भारतीय संघाला मोठा धक्का! कर्णधार रोहित आऊट 

भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा 69 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. नॅथन लायनने त्याला क्लीन बोल्ड केले.

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू! दुखापतग्रस्त वॉर्नर सामन्यातून बाहेर

KL राहुल पुन्हा फ्लॉप! भारताला पहिला धक्का

भारताला पहिला धक्का 46 धावांवर बसला आहे. राहुल 41 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. नॅथन लायनने त्याला पायचीत केले.

पहिल्या दिवशी सामन्यात काय झालं ?

नागपूरमधील पहिली कसोटी पहिला दिवस ऑस्ट्रेलिया सर्वबाद १७७... दिल्लीतील दुसरी कसोटी पहिला दिवस ऑस्ट्रेलिया सर्वबाद २६३... आजपासून सुरू झालेल्या या कसोटीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चुका टाळत बऱ्यापैकी प्रतिकार केला. त्यामुळे नागपूर कसोटीपेक्षा ८६ धावा अधिक करता आल्या. दिवसअखेर भारताने बिनबाद २१ धावा करून ऑस्ट्रेलियाला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा लाभ मिळू दिला नाही.

नागपूर आणि दिल्लीतील खेळपट्टींमध्ये फरक आहे; तरीही भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व राखले. चेंडू जास्त वळत नसला तरी खाली रहात आहे. फिरकी गोलंदाजांसाठी संधी असली, तरी वेगवान गोलंदाज महम्मद शमीने चार विकेट मिळवून खेळपट्टी नव्हे, तर अचूकतेवर विकेट मिळवायच्या असतात, हे दाखवून दिले. उर्वरित जबाबदारी आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन विकेट मिळवत पार पाडली.

नाणेफेकीचा कौल या वेळेसही पॅट कमिन्सच्या बाजूने लागला आणि पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजी करायला मिळाली. वेगाने मारा करायच्या प्रयत्नात महम्मद शमीने सुरुवातीला काहीसा स्वैर मारा केला. दिल्लीची खेळपट्टी फलंदाजीकरिता चांगली असल्याचे दिसू लागले. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजाने खराब चेंडूंचा समाचार घेताना धावफलक पळवला. सिराजचा एक चेंडू वॉर्नरच्या उजव्या कोपरावर; तर एक चेंडू हेलमेटवर आदळला. सलामीच्या जोडीने अर्धशतक फलकावर लावल्या होत्या. एंड बदलून शमीला मारा करायला रोहित शर्माने बोलावले ज्याचा फायदा झाला. टप्पा पडून हलकेच बाहेर जाणाऱ्या चेंडूवर वॉर्नर यष्टिरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला.

रोहित शर्माने फिरकी मारा चालू करताना पहिली संधी अश्विनला दिली. सामन्याच्या पहिल्या दिवशीसुद्धा अश्विनला चेंडू वळवता येत होता. फक्त खेळपट्टी चांगली असल्याने त्यात भेदकता कमी होती. आपले सगळे कौशल्य पणाला लावून अश्विनने प्रथम मार्नस लाबुशेनला पायचित केले आणि नंतर टप्पा पडून बाहेर जाणारा चेंडू टाकून सर्वात धोकादायक फलंदाज स्टीव्ह स्मिथला झेलबाद केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०० विकेट घेण्याचा टप्पा अश्विनने गाठला. उस्मान ख्वाजा पायचित होताना वाचल्याने ऑस्ट्रेलियाला उपाहाराला ३ बाद ९४ ची चांगली मजल मारता आली.

मधूनच शमी आणि सिराजला मारा करायला बोलवण्याची रोहित शर्माची योजना प्रभाव पाडत होती. शमीने ट्रॅव्हीस हेडला बाद केले तेव्हा वेगवान झेल के. एल. राहुलने पकडला. दुसऱ्या बाजूने ख्वाजा सुंदर आक्रमक फलंदाजी करत होता. स्वीप आणि रिव्हर्स स्वीपचा मुक्त वापर करताना ख्वाजाने अर्धशतक केले. ख्वाजा - हॅडस्कोंबच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी रचून भारतीय गोलंदाजांना थोपवून धरले होते. भागीदारी तोडण्याचे भाग्य रवींद्र जडेजाला लाभले असले, तरी तो बळी के. एल. राहुलच्या नावावर लागेल इतका अफलातून झेल राहुलने पकडला. त्या विकेटसह रवींद्र जडेजाने २५९ बळींची मजल गाठली. १२ चौकार एका षटकारासह उस्मान ख्वाजाने ८१ धावा केल्या. अलेक्स केरीचे आव्हान अश्विनने लगेच संपवले.

सहा प्रमुख फलंदाज बाद झाले असताना हँडस्कोंबने एक बाजू लावून धरली. कमिन्सने संयमी साथ देत त्याच्यासोबत अर्धशतकी भागीदारी रचल्याने ऑस्ट्रेलियन धावसंख्येला थोडा आकार आला. पहिल्या कसोटी सामन्यात फिरकीला खेळण्याचे चांगले तंत्र दाखवणाऱ्‍या हँडस्कोंबने अर्धशतकी मजल मारली. पहिल्या दिवशीच्या खेळात दोन फलंदाज पाठोपाठ बाद होण्याचा सपाटा लागला होता. कप्तान कमिन्स बाद झाल्यावर जडेजाने टेड मर्फीला बोल्ड केले.