
IND vs AUS: ऑस्ट्रेलियात संघात भूकंप! भारताविरुद्धच्या 2 पराभवानंतर कांगारूंचा कर्णधार परतला घरी
India vs Australia Test : भारताविरुद्ध सलग दोन कसोटी पराभवानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात खळबळ उडाली आहे. संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स मायदेशी परतला आहे. वैयक्तिक कारण सांगून कमिन्सने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. भारत दौऱ्यावर आलेल्या कांगारू संघाला सलग 2 कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
पाहुण्या संघाने दोन्ही कसोटी 3 दिवसांतच शरणागती पत्करल्या. बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 2-0 ने पुढे आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे.
पॅट कमिन्स तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतात परतला नाही तर इंदूर कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाची कमान सांभाळू शकतो. दिल्ली कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. सध्याच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये गोलंदाज म्हणून कमिन्सची कामगिरी काही विशेष नव्हती. कमिन्सने नागपूर आणि दिल्ली कसोटीत एकूण 3 विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियन लेग-स्पिनर मिचेल स्वीपसन गेल्या आठवड्यात त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी मायदेशी परतला होता. स्वीपसनच्या जागी क्वीन्सलँडचा फिरकीपटू मॅथ्यू कुहनेमनला ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळाले. तिसर्या कसोटीपूर्वी स्वीपसन ऑस्ट्रेलियन संघात सामील होण्याची शक्यता आहे.
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी ऑस्ट्रेलियावर 6 विकेट राखून धडाकेबाज विजय मिळवला, यासोबत कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले. ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर कायम आहे, तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र दोन्ही संघांमध्ये जास्त फरक नाही, त्यामुळे भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित आहे.