
IND vs AUS : 'जडेजा गोलंदाजी करताना कधी कधी कप्तान म्हणून मला...' रोहित काय बोलला
India vs Australia 3rd Test : गेल्या दोन सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघातील फलंदाज भारतीय फिरकीला खेळताना गांगरून गेले, ज्याला अश्विन आणि जडेजाची अचूक गोलंदाजी कारण होती, तसेच त्यांच्या फलंदाजांना विचार करायला वेळच मिळत नव्हता हे कारणसुद्धा होते, असे मत भारतीय कर्णधार रोहितने तिसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले.
यासंदर्भात अधिक स्पष्टपणे बोलताना रोहित म्हणाला, खास करून जडेजा गोलंदाजी करताना खूप कमी पावले पळत येतो. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर त्याला जास्त फटके मारता येत नसल्याने जडेजाचे षटक बघता बघता संपते. फलंदाजाला दोन चेंडूंदरम्यान क्षणभरही विश्रांती घेता येत नाही इतका तो पटापट चेंडू टाकतो. कप्तान म्हणून कधी कधी मला त्याचा हा वेग झेपत नाही, कारण मला क्षेत्ररक्षणात काही बदल करायला तो वेळच देत नाही.
भारतीय संघातील प्रमुख फलंदाजांकडून अपेक्षित धावा जमा झालेल्या नाहीत. फलंदाजी करायला गेल्या दोन कसोटी सामन्यांतील खेळपट्ट्या सोप्या नव्हत्या. तरीही कसेही करून आम्हाला चांगली धावसंख्या उभारून देण्याचे काम पूर्ण करावे लागेल. दोन वेळा जडेजा, अश्विन आणि अक्षर पटेलने संघाला गरज असताना सुंदर फलंदाजी केली. जडेजा आणि अक्षर त्यांच्या रणजी संघासाठी खूप वरच्या क्रमांकावर फलंदाजी करतात, कारण ते चांगले फलंदाज आहेत. पहिल्या डावात चांगला खेळ करून धावा फलकावर लावता आल्या तर मोठे काम होऊन जाईल, असे रोहितने सांगितले.
सुट्टीचा असाही उपयोग
सतत क्रिकेट खेळणे सुरू असल्याने दिल्ली कसोटीनंतर हाती लागलेली सुट्टी मोलाची ठरली आहे. आमचा सहकारी शार्दुल ठाकूरच्या लग्नात सहभागी होता आले, याचा आनंद आहे.
बरेच खेळाडू घरी जाऊन विश्रांती घेऊन ताजेतवाने होऊन उत्साहाने इंदूरला आले आहेत. गेले दोन दिवस सरावासोबत आम्ही कसे इंदूर कसोटी सामन्याला सामोरे जाणार याची चर्चा केली आहे.
थोडक्यात सांगायचे तर भारतीय संघ तयारी करून तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे, असे भारतीय कर्णधार म्हणाला.