Virat Kohli : 1206 दिवसांनंतर प्रतीक्षा संपली! विराट कोहलीने ठोकले 28 वे कसोटी शतक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli smashes 28th Test hundred

Virat Kohli : 1206 दिवसांनंतर प्रतीक्षा संपली! विराट कोहलीने ठोकले 28 वे कसोटी शतक

IND vs AUS 4th Test Virat Kohli : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण भारताची 1206 दिवसांनंतर प्रतीक्षा संपली आहे. अहमदाबादमध्ये विराटने कारकिर्दीतील 75 वे शतक ठोकले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी त्याने ही कामगिरी केली.

कोहलीचे हे 28 वे कसोटी शतक आहे, ज्याची सर्वांना गेल्या 40 महिन्यांपासून प्रतीक्षा होती. कोहलीने 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचे कसोटी शतक झळकावले होते. तेव्हापासून तो धावांच्या दुष्काळाशी झुंजत होता.(Virat Kohli smashes 28th Test hundred)

या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये फ्लॉप झाल्यानंतर ही ऐतिहासिक खेळी विराट कोहलीच्या बॅटने पाहायला मिळाली आहे. विराट कोहलीने गेल्या वर्षी आशिया चषक 2022 मध्ये पहिले टी-20 शतक झळकावले होते.

त्याचवेळी डिसेंबर महिन्यात प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर त्याला वनडे फॉरमॅटमध्ये आपल्या बॅटने शतक झळकावताना पाहायला मिळाले. आता कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीने 3 वर्षांनंतर 100 धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे 28 वे कसोटी शतक आहे. यापूर्वी, 22 नोव्हेंबर 2019 रोजी त्याने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत शतक झळकावले होते.

विराट कोहलीचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वे शतक आहे. विराट कोहलीने वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 46 शतके झळकावली आहेत आणि विराट कोहलीची कसोटीत 28 शतके आहेत. त्याचवेळी विराट कोहलीचे टी-20 मध्ये शतक आहे, जे आशिया कप 2022 मध्ये अफगाणिस्तान संघाविरुद्ध दिसले होते.

अहमदाबाद कसोटी सामन्यात टीम इंडियाचा डाव सांभाळण्याचे काम विराट कोहलीने केले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर विराट कोहलीपूर्वी युवा सलामीवीर शुभमन गिलने 128 धावांची खेळी केली. त्याचवेळी चेतेश्वर पुजाराने 42 आणि कर्णधार रोहित शर्माने 35 धावा केल्या.